मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी समाज कल्याण विभागाची आर्थिक सहाय्य योजना

 


 

          कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना कार्यान्वित आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र अपंग-अव्यंग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

या योजनेमध्ये किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 25 हजार रू. चे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रु. रोख रक्कम, 4 हजार 500 रु. संसार उपयोगी साहित्य/वस्तू खरेदीसाठी व 500 रु. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी असे एकुण 50 हजार रूपयाचे अर्थसहाय्य दिले जाते, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

       योजनेच्या अटी व शर्ती  - वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र असावे. (जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र) अपंग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

000000

         

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.