कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय):
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)
अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही
सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्ह्यातील सर्व
गावांमध्ये श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा
शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत ग्राम पंचायत शिरोली
(पुलाची), ता. हातकणंगले येथे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते स्वच्छता
श्रमदान व शोषखड्डा बांधकामाचा शुभारंभ झाला. ग्रामपंचायत सडोली (खालसा), ता.
करवीर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्वच्छता श्रमदानाच्या माध्यमातून अभियानाचा
शुभारंभ केला. ग्रामपंचायत मसोली, ता. आजरा येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव
शिंपी यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर
स्वच्छता श्रमदान करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमार्फत
स्वच्छता फेरी व सायकल रॅलीचे आयोजन करून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. गावामध्ये
स्वच्छता घोषवाक्य रंगविणे स्पर्धेअंतर्गत स्वच्छतेचे संदेश रंगविण्यात आले. तसेच
शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे बांधकाम
शुभारंभ व प्लास्टीक संकलन असे विविध स्वच्छता विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात
आले. यासोबत पदाधिकारी व अधिकारी यांनी गावातील स्वच्छतेबाबत उपस्थितांना
मार्गदर्शन केले. या अभियानातील विविध स्वच्छता उपक्रमांमुळे जिल्ह्यातील जास्तीत
जास्त गावे हागणदारीमुक्त (ODF +) होण्यासाठी मदत होईल.
या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत
समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक,
ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व ग्रामस्थ मोठया संख्येने
सहभागी झाले होते, अशी माहिती जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.