कोल्हापूर दि. ३ : शेतकर्यांना भाजीपाला आणि फळे यांची थेट विक्री करता यावी यासाठी परवानगी देण्याचा राज्य शासन विचार करीत आहे, अशी माहिती कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली. ठिबक सिंचनाचे दर तीस टक्क्यांनी कमी व्हायला हवेत यासाठीही राज्य शासन धोरण आखत असून येत्या दोन ते तीन महिन्यात ठिबक सिंचनाचे दर निश्चित करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तांदूळ महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना, राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, सौ. प्रतिमा सतेज पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. येथील सासने ग्राऊंडवर आयोजित हा तांदूळ महोत्सव पाच मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
राज्याच्या कृषि विकासाचा दर दहा टक्क्याहून अधिक व्हायला हवा, असे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत, असे सांगून श्री. विखे-पाटील म्हणाले, कृषि विकास दर वाढण्यासाठी उत्पादकता वाढायला हवी आणि शेती मालाच्या दरातही वाढ व्हायला हवी.
शेतकर्यांना थेट बांधावर खत उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे सांगून श्री. विखे-पाटील म्हणाले, भाताच्या विक्रीचे काम पणन मंडळाकडे देण्याचा विचार आहे. तसेच भातासाठी शेतमाल तारण कर्ज देण्याचा विचार शासन करीत आहे. सहकारी तत्वावर भातापासून तांदूळ निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारल्यास त्यास राज्य शासन निधी देईल. तांदूळ महोत्सवासारख्या उपक्रमामुळे शेतकर्यांना आपणही चांगला विक्रेता होऊ शकतो याचा आत्मविश्वास दिला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकर्याला त्यांच्या उत्पादनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाचे आभार मानतो. त्याचबरोबर महिला बचत गटांना शेती मालाचे विपणन करण्यासाठी अनुदान द्यायला हवे. बचत गट आणि शेतकरी मंडळ यांच्यातील समन्वयाने शेती मालाचे विपणन शक्य होईल.
राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे म्हणाले, शेतीत आता वैविध्य आणले पाहिजे. त्याचबरोबर शेतीत यांत्रिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. शेतकर्यांनी मूल्यवर्धन प्रक्रिया आत्मसात करायला हवी.
जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रत्येक गावात शेतकरी मंडळ स्थापन करायला हवे, असे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांनी केले. विजयेंद्ग धुमाळ यांनी आभार मानले. यावेळी कृषि सहसंचालक डॉ. मधुकर घाग, उपसंचालक डॉ. सुधर्म जामसांडेकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.