इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, २५ मार्च, २०१२

ग्रंथदालनामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल - पालकमंत्री

      कोल्हापूर दि. २५ : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या ग्रंथदालनामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
      कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या ग्रंथदालनाच्या बांधकामाचे त्यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्गदीप नरके, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      पालकमंत्री म्हणाले, ग्रंथदालनाच्या उभारणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे विविध प्रकारच्या नागरिकांपैकी काही नागारिक तरी भेट देतील. ते काही पुस्तके विकत घेतील. त्यांना नव्या पुस्तकांची ओळख होईल. अशाप्रकारे वाचन संस्कृती जोपासली जाईल. ग्रंथादालनाचे काम गतीने आणि गुणवत्तापूर्ण व्हावे. त्यासाठी अधिकार्‍यांनी लक्ष घालावे.
      साहित्यिक राजन गवस म्हणाले, मराठी भाषेच्या विकासासाठी ग्रंथदालनासारखा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. राज्यात इतरही अशा प्रकारची ग्रंथदालने उभारली जातील. ग्रंथदालनामुळे सामान्य माणसांपर्यंत पुस्तके पोहोचण्यास मदत होईल.
      यावेळी साहित्यिक कृष्णात खोत, सखा कलाल, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.