शुक्रवार, ९ मार्च, २०१२

शिक्षक/शिक्षण सेवकांच्या मान्यतेबाबत कोल्हापुरात शिबीराचे आयोजन

           कोल्हापूर दि. ९ : अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नियुक्त केलेल्या शिक्षक/शिक्षण सेवकांच्या मान्यतेबाबत चालू शैक्षणिक वर्षात ७ ते १५ डिसेंबर २०११ कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन परिपूर्ण प्रस्तावाबाबत निर्णय घेऊन  संबंधित कनिष्ठ  महाविद्यालयास  कळविण्यात  आले आहे. तथापि प्राप्त झालेल्या अपुर्‍या प्रस्तावातील त्रुटी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात आलेल्या आहेत. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी अशा त्रुटींची पूर्तता केली असेल तर अशा नियुक्त्यांच्या मान्यतेसंदर्भात पुढील कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
      विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, हत्तीमहल, सोमवार पेठ, कोल्हापूर येथे १३ मार्च ते २२ मार्च २०१२ कालावधीत सकाळी १० ते सायं. ५-४५ या वेळेत शिबीर घेण्यात येणार आहे. तालुकावार शिबीराचे आयोजन पुढीलप्रमाणे असून जिल्हानिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर जिल्हा- दि. १३ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर, करवीर, पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, दि. १४ मार्च रोजी राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, दि. १५ मार्च रोजी हातकणंगले, शिरोळ व कागल तालुका. सांगली जिल्हा- दि. १६ मार्च रोजी वाळवा, शिराळा, तासगाव, खानापूर, पलुस, कडेगांव, दि. १७ मार्च रोजी कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, मिरज, सांगली शहर, सातारा जिल्हा- दि. १९ मार्च रोजी सातारा, कोरेगांव, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, दि. २० मार्च रोजी माण, फलटण, खटाव, पाटण आणि कराड. दि. २१ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि २२ मार्च २०१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके.
      वेळापत्रकाप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेस कनिष्ठ महाविद्यालयाकडे नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ततेसह कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संबंधित काम पहाणारे लिपिक यांनी वेळेत उपस्थित रहावयाचे आहे. नियुक्त केलेल्या शिक्षकांचा यापूर्वी प्रस्ताव सादर केला नसल्यास तो विहित नमुन्यात सादर करावा. शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये यापुढे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सेवक मान्यता शिबीर घेण्यात येणार नसल्याने आयोजित केलेल्या शिबीरात प्रस्ताव सादर न केल्यास वा त्रुटी पूर्तता न केल्याने त्याबाबत तक्रार उद्‌भवल्यास व न्यायालयीन बाब उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था व मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील असे कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.