कोल्हापूर दि. १६ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर यांच्यातर्फे कोल्हापुरात १७ ते २१ मार्च २०१२ कालावधीत सासने मैदान, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे ताराराणी कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन व तालुकास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण समारंभ १८ मार्च २०१२ रोजी सकाळी ११-३० वाजता सहकार आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व कामगार, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. महोत्सवाच्या उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभास ग्रामविकास, गृह आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार व आमदार तसेच वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९-३० पर्यंत असून स्वयंसहाय्यता बचत गटांच्या महिलांसाठी दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महिला सक्षमीकरणावर तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सायं. ६ ते ९-३० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असे कोल्हापूरच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.