बुधवार, ७ मार्च, २०१२

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले

        कोल्हापूर दि. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक यांना त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे सन २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये २१००/- असे पुरस्काराचे स्वरुप असून गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार एक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता/संघटक पुरस्कार एक आणि गुणवंत खेळाडू पुरस्कार एक असे एकूण तीन पुरस्कार १ मे महाराष्ट्र दिनी दिला जातो.
      गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी सतत पाच वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात कार्य केले पाहिजे. वरिष्ठ गटातील (सिनीयर/ओपन) सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, नॅशनल गेम्स, फेडरेशन चषक स्पर्धा अथवा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम चार क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक व गेल्या दहा वर्षात राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहील.
      गुणवंत संघटक/कार्यकर्ता पुरस्कारासाठी क्रीडा कार्याचा किमान १० वर्षाचा अनुभव व त्याचे वय किमान ५० वर्षे असणे अनिवार्य आहे. सलग ५ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे. संघटक/कार्यकर्त्याने कोणते मार्गदर्शनात्मक कार्य केले याची क्रीडा प्रचार व प्रसार व इतर कार्य असे कार्याचे स्वरुप असेल.
      गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षाच्या लगत पूर्व पाच वर्षातील वरिष्ठ गटातील (सिनीयर) कामगिरीचा विचार केला जाईल. उत्कृष्ट ठरणार्‍या या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार गुणाकन कोष्टकाप्रमाणे करण्यात येईल. खेळाडूने स्पर्धेच्या मूळ प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक राहील. खेळाडूचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारस करुन सादर करणे आवश्यक आहे. तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिकरित्या अर्ज करु शकतो.
      पुरस्कारासाठी अर्ज करणार्‍या अर्जदाराचे कोल्हापूर जिल्ह्यात सलग १० वर्षे वास्तव्य असले पाहिजे. तसेच वरील पुरस्कारासाठी एक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एक प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्या खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. पुरस्काराचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज दि. १७ मार्च २०१२ पर्यंत कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे कोल्हापुरचे जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.