कोल्हापूर दि. १५ : धीर करा आणि कामाला सुरवात करा. इतकं चांगल काम करा की येत्या काही वर्षात निवडणूक लढवण्यासाठी आरक्षण मागण्याची वेळच येता कामा नये, असा सल्ला आज राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला सदस्यांना दिला.
राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती प्रशिक्षणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण आणि जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. मार्केट यार्ड येथील श्री राजर्षी शाहू सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी मुदगल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने, समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, सौ. सुमन भगवान साळुंखे, प्रकल्प संचालक पी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
श्रीमती नीला सत्यनारायण म्हणाल्या, राज्यात ७६ हजार ग्रामपंचायत सदस्या आहेत. पण त्यांचा निर्णय प्रक्रियेत हवा तितका सहभाग दिसत नाही. आरक्षण आहे म्हणून केवळ त्या निवडून आल्या आहेत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी क्रांतीज्योती प्रशिक्षण आयोजित करण्याची संकल्पना आखण्यात आली. या प्रशिक्षणाचा चांगला लाभ घेऊन त्यानुसार कामकाज करा.
महिलांनी ठरवल तर ना हुंडाबळी होतील, ना स्त्रीभ्रृण हत्या होईल, असे सांगून त्या म्हणाल्या, आपल्या गावात आवश्यक असणार्या पाच योजनांची माहिती तयार करुन त्याचा पाठपुरावा करा. त्याच्या माध्यमातून गावाचा विकास करा. संगणक, इंटरनेट, मोबाईल या तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात करावी. त्यामुळं आत्मविश्वास मिळेल आणि काम करण्यास अधिक सहजसोपं वाटेल.
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी महिलांची राजकीय प्रणालीतील केवळ संख्या वाढून उपयोग नाही तर गुणवत्ताही वाढायला हवी. त्यासाठी महिला सदस्यांनी या प्रणालीची माहिती करुन घ्यायला हवी, असे सांगितले.
क्रांतीज्योती प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील काही निवडक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पण हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्याने राबवून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांचे अभिनंदन निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, उपाध्यक्ष धैर्यशील माने, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.