कोल्हापूर दि. १८ : बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे चांगल्या प्रकारे सक्षमीकरण झाले पाहिजे. पण बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन सहकार, संसदीय कामकाज आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित बचत गटांचे प्रदर्शन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, गृह, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, कोल्हापुरच्या महापौर कादंबरी कवाळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, आपल्या देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. या महिलांनी काम करुन देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे, असे राज्य आणि केंद्ग शासनाचे धोरण आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, म्हणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून एक क्रांती होत आहे. या माध्यमातून महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे. हा आत्मविश्वास वाढण्यासाठी बचत गटाच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने शासन प्रयत्न करीत आहे.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ज्या देशात महिलांना संधी देण्यात आली त्या देशांनी आर्थिक क्रांती साकारली. त्या देशांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. म्हणून महिलांना संधी देण्याची आवश्यकता आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, बचत गटांच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरुप मिळायला हवं. त्यासाठी शासन धोरण आखत आहे. ताराराणी महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल.
प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी तर प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.