रविवार, ४ मार्च, २०१२

पक्षकारांनी ईर्षा सोडून तडजोडीने केसेस मिटविण्यास सहकार्य करावे - जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. लोंढे

कोल्हापूर दि. ४ : पक्षकारांनी ईर्षा सोडून उदार अंतकरणाने वाद संपवून सामंजस्याने व तडजोडीने केसेस मिटविण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. लोंढे यांनी आज केले.
कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतचे उद्‌घाटन न्यायाधिश व्ही. आर. लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरात १८ सप्टेंबर २०११ रोजी घेण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ५३६१ केसेस तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत, असे सांगून व्ही. आर. लोंढे म्हणाले, आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये प्रलंबित ४८६२ केसेस ठेवण्यात आल्या आहेत. सर्व तालुका पातळीवर लोकअदालतचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण २६ हजार २४६ प्रलंबित केसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. महालोकअदालतसाठी एकूण ३१ पॅनेल ठेवण्यात आली आहेत. सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी व बंधुभाव टिकविण्यासाठी पक्षकार जास्तीत जास्त केसेस तडजोडीने मिटवून कोल्हापुरचा उच्चांक निर्माण करतील असा विश्वासही श्री. लोंढे यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा न्यायाधिश-१ श्रीमती पी. डी. देसाई, जिल्हा न्यायाधीश पी. एच. माळी, मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव योगेश राणे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य शिवाजीराव चव्हाण, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संपतराव पोवार, फौजदारी बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय नरंदेकर, जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे, न्यायाधीश, वकील वर्ग, बँक व वित्तीय संस्थांचे अधिकारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.