बुधवार, १४ मार्च, २०१२

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य - डॉ. म्हैसेकर

       कोल्हापूर दि. १४ : जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
      जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे शौर्यपदक धारक सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार आणि धनादेश वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक उपस्थित होते.
      डॉ. म्हैसेकर म्हणाले, भारतीय सैन्यदलातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला अतीव आदर आहे. सैन्यदलातील अनेकांशी आपले जवळचे संबंध आहेत. आजी-माजी सैनिकांच्या जिल्हा परिषदेशी निगडीत सर्व समस्या प्राधान्याने सोडवू.
      निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार म्हणाले, जमीन मिळण्यासाठी एक लाख रुपयांची अट असल्यामुळे माजी सैनिकांना जमीन मिळण्यात अडचणी येतात. सहाव्या वेतन आयोगामुळे निवृत्ती वेतनात वाढ झाली आहे. उत्पन्नाची ही अट वाढविण्यासाठी माजी सैनिक संघटनांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
      कर्नल नाईक यांनी कल्याणकारी निधी अंतर्गत विविध योजनाखाली १५२२ लाभार्थींना ६४ लाख ८५ हजार रुपये, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत १४ लाभार्थींना २ लाख ७ हजार रुपये तसेच दुसर्‍या महायुध्द अनुदाना अंतर्गत ११५० लाभार्थींना २ कोटी रुपयांहून अधिक निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.
      आज शौर्यपदक धारक १४ सैनिकांच्या कुटुंबियांना ४ लाख १० हजार, ३९ माजी सेनिकांना विविध योजनाखाली कल्याणकारी निधीमधून ४ लाख रुपये आणि दुसर्‍या महायुध्दातील ९०० लाभार्थींना १ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करुन लाभार्थींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन स्मीता पाटील यांनी केले. सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी अनिल सरदेसाई यांनी आभार मानले.
फोटो ओळी -
      कोल्हापुरात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात माजी सैनिकांचा मेळावा झाला. यावेळी लाभार्थींना निधीचा धनादेश देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर. शेजारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक आदी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.