इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, १८ मार्च, २०१२

सुसंस्कृत समाज निर्मितीसाठीकायद्यांची माहिती आवश्यक - मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे

          कोल्हापूर दि. १८ : सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी तसेच समाजाच्या हितासाठी व महिलांच्या कल्याणासाठी केंद्ग व राज्य शासनाने केलेल्या विविध कायद्यांची व योजनांची माहिती ग्रामस्थांनी करुन घेतली पाहिजे असे प्रतिपादन कोल्हापुरचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे यांनी आज तिसंगी येथे केले.
      गगनबावडा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने तिसंगी गावांत बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर घेण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
      प्रत्येकाला कायद्याची किमान माहिती व्हावी, तो माहितीविना वंचित राहू नये असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, जमिनीच्या सात-बारा विषयी ग्रामस्थांनी जागरुक असले पाहिजे. यासाठी किमान वर्षातून एकदा तरी जमिनीचा सात-बारा उतारा काढायला हवा, म्हणजे त्यावरील नोंदीची कल्पना येते. महिलांनी कायद्याचा आपल्या भल्यासाठी वापर करावा.
      तृतीयपंथीयांचे हक्क कायद्याविषयी न्या. एस. एम. पाटील, माहितीचा अधिकार विषयी न्या. ए. बी. कुलकर्णी, महिलांचे हक्क संरक्षण कायद्याविषयी न्या. एच. एस. भोसले तसेच शासकीय लोककल्याणकारीयोजनाविषयी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि महिला व बालकांच्यासाठी असणार्‍या लोककल्याणकारी योजनांविषयी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी ग्रामस्थांना सोदाहरण माहिती देवून मार्गदर्शन केले.
      गटविकास अधिकारी जी. बी. सावंत यांनी ग्रामपातळीवर कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यामागील उद्देश विशद केला. यावेळी आम आदमी योजनेंतर्गत लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शाहीर रंगराव पाटील यांनी महिलांविषयी असणार्‍या योजनांची व कायद्यांची माहिती पोवाड्यातून सोप्या शब्दात करुन दिली. 
      कायदेविषयक शिबीरास तहसिलदार अजय पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत वसेकर, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, सरपंच आनंदराव पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री. वाघरे यांनी आभार मानले तर संजय पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.