कोल्हापूर दि. ७ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाज सेवक तसेच स्वयंसेवी संस्थांना सन २०१२-१३ करिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे विनामूल्य मिळतील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व पोलीस खात्याकडील वर्तुणुकीचा दाखला, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे, केलेल्या कार्याचा तपशील व त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे, कात्रणे आदी कागदपत्रांसह तीन प्रतीमध्ये प्रस्ताव विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात १५ एप्रिल २०१२ अखेर सादर करावेत.
कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांच्याकरिता पुढील पात्रता आवश्यक आहे. मातंग समाजाकरिता समाज कार्य आणि कलात्मक, साहित्यिक क्षेत्रात कार्य, कल्याणासाठी झटणारे नामवंत कलावंत, साहित्यिक व समाज सेवक असावेत. या क्षेत्रात कमीत कमी १० वर्ष कार्य केलेले असावे. पुरुष कमीत कमी ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त आणि स्त्रीयांसाठी कमीत कमी ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त अशी वयोमर्यादा आहे. कोणत्याही व्यक्तीस, संस्थेस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचा विचार केला जाईल.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे. समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन जनजागरण आदी क्षेत्रात कार्य करणार्या सामाजिक संस्था असाव्यात. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० वा सोसायटी रजि. अॅक्टनुसार पंजीबध्द असावी. संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील कार्य दहा वर्षापेक्षा जास्त असावे व संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. मातंग समाज सेवा आणि समाजाचा विकास क्षेत्रातील कामाचा विचार करुनच संस्थेचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल. संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल व संस्थेच्या घटनेत प्रमाणित प्रत आवश्यक आहे.
इच्छुकांनी १५ एप्रिल २०१२ पर्यंत वेळेत प्रस्ताव सादर करावेत. विलंबाने प्राप्त होणारे प्रस्ताव तसेच अपुरे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.