कोल्हापूर दि. ३ : कोल्हापुरात गुळाच्या साठवणुकीसाठी शीतगृह उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल पण त्यासाठी स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यायला हवा असे कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे सांगितले.
कृषि विभाग आणि कृषि महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतीशील शेतकरी गटांचा मेळावा व किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. मधुकर घाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे उपस्थित होते.
शेतीविषयक धोरण ठरवले जात असताना शासन आणि शेतकरी यांच्यात संवाद साधला जावा यासाठी शेतकरी गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या चर्चेतून राज्य शासन शेतकर्यांच्या हितासाठीच कार्यक्रम राबवेल. शेतकर्यांशी चर्चा करण्यामुळे समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती मिळाली आहे. धोरण आखताना त्याचा लाभ होणार आहे, असे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी शेतकर्यांनी आपल्या विविध समस्या आणि अडचणी याबाबत कृषिमंत्र्यांशी संवाद साधला. त्यामध्ये खताच्या किंमतीत होणारे बदल, धान्य साठवणुकीसाठी गोदामांची गरज, फुलांच्या विक्रीसाठी बाजारपेठ विकसित करणे, शेतकर्यांना बनावट बियाण्याद्वारे फसवणूक करणार्या व्यापार्यांविरोधात लढण्यासाठी वकील मिळावा अशा विविध मागण्या शेतकर्यांनी मांडल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.