इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २६ मार्च, २०१२

शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासाचे शासनाचे धोरण विधान परिषद सभापती देशमुख यांचे प्रतिपादन

       कोल्हापूर दि. २६ : सामान्य माणूस आणि शेतकरी यांना केंद्गबिंदू मानून विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.
      पन्हाळा तालुक्यातील माले येथील श्री जयभवानी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विनय कोरे, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, संस्थेचे अध्यक्ष सचिन जमदाडे आदी उपस्थित होते.
      श्री. देशमुख म्हणाले, शेतकरी, कष्टकरी यांचा आर्थिक विकास साधणे याला प्राधान्य आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनीला पाणी मिळायला हवे. म्हणूनच राज्य शासनाने जयभवानी पाणीपुरवठा संस्थेला कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने उचललेले सकारात्मक पाऊल अतिशय महत्वाचे आहे. शासनाच्या या निर्णयाचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.
      पालकमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, जयभवानी पाणी पुरवठा संस्था कर्जमुक्त झाल्यामुळे या परिसरात आर्थिक परिवर्तन येईल. या पाणीपुरवठा संस्थेच्या जोरावर येथील शेतकर्‍यांची मुले चांगले आणि उच्च शिक्षण घेऊ शकतील.
      ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकर्‍यांना न्याय दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. जयभवानी पाणीपुरवठा संस्थेला कर्जमुक्त करुन राज्य शासनाने शेतकर्‍यांना आधार दिल्याबद्दल आमदार विनय कोरे यांनी राज्य शासन आणि पालकमंत्र्यांचे आभार मानले.
      यावेळी सभापती देशमुख आणि पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शेतकर्‍यांना कोर्‍या झालेल्या सात-बाराचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सचिन जमदाडे यांनी प्रास्ताविक तर राजू जमदाडे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.