गुरुवार, १५ मार्च, २०१२

ग्राहकांनी फसवणूक होऊ नये म्हणून हक्कांबरोबरच कायदे व जबाबदारीची जाणीव ठेवावी - अपर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज

         कोल्हापूर दि. १५ : ग्राहकांनी फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांचे हक्क, कायदे व जबाबदारी यांची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी केले.
      कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना अप्पासाहेब धुळाज बोलत होते.
      राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागील वेगवेगळ्या दृष्टीकोनाची माहिती देवून अप्पासाहेब धुळाज यांनी तालुका पातळीवर ग्राहक मंचातर्फे निःस्वार्थी कार्य करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
ग्राहकांनी विशेषतः सोन्याचे जिन्नस खरेदी करताना त्यामध्ये मिसळण्यात येणार्‍या इतर अनुषंगिक धातुंच्या प्रमाणाची माहिती घेतली पाहिजे, असे सांगून ग्राहक पंचायतीचे संघटक संजय हुकेरी यांनी उदाहरणांसह जाहिरातींच्या भुलभुलैयांना फसू नये असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रसाद बुरांडे म्हणाले, ग्राहकांनी हरएक वस्तुची खरेदी करताना जागृत असणे आवश्यक आहे. वस्तुची विक्री व्हावी यासाठी विक्रेते प्रयत्न करीत असताना ग्राहकाने चोखंदळ राहिले पाहिजे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदविल्यास निश्चित मदत केली जाईल असे सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी विषद करुन ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
ग्राहकांमध्ये जागृती होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, अन्न आणि औषध प्रशासन, भारत गॅसचे वितरक, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग, वैध मापन शास्त्र यंत्रणा आदी विभागांच्यावतीने विविध माहितीचे फलक यावेळी लावण्यात आले होते.
शहर पुरवठा अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सहाय्यक पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी आभार मानले. सूत्रसंचलन पुरवठा निरीक्षक टी. डी. पोवार यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रकल्प अधिकारी शारदा पाटील, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, बचत गटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.