शुक्रवार, १५ मे, २०२०

रेल्वेने प्रवाशांसाठी वैद्यकीय तपासणी यंत्रणा उभी करावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई



    

       कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय)  :  साधारण प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने उभी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.   
          जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केंपी-पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिवन अल्वारीस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,  सहाय्यक विभागीय सिग्नल आणि टेलीकम्युनिकेशन अभियंता राजीव कुमार जैन, समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोल्हापूरमध्ये येणाऱ्या रेल्वेतील प्रत्येक प्रवाशांची तपासणी थर्मल स्कॅनींगने करा, रेल्वे विभागाने एक दिवस आधी येणाऱ्या प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाला द्यावी त्यानुसार संबधित विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकाला बॅरिकेटींग करावे. बाहेर जाण्यासाठी आणि प्रवेशासाठी असे दोनच मार्ग खुले ठेवावेत वैद्यकीय पथकासाठी स्वतंत्र कक्ष करावा परिवहन विभागाने प्रवाशांच्या वाहतूक सोयीबाबत नियोजन करावे. संबंधित प्रत्येक विभागाचा एक नोडल अधिकारी यासाठी नियुक्त करावा, असेही ते म्हणाले.
          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यावेळी म्हणाले येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा स्वॅब घेण्यासाठी स्वतंत्र सुविधा रेल्वेने उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर संबंधित प्रवाशी ज्याठिकाणी जाणार आहे अथवा ज्या ठिकाणाहून बसलेला आहे याबाबतची माहिती उपलब्ध करून द्यावी.
          सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि प्रत्येक प्रवासाची तपासणी होण्याच्या दृष्टीने रेल्वे फलाटावरच एका रांगेत योग्य अंतर ठेवून प्रवासी बाहेर आणण्याची सुविधा रेल्वेने आधीच करावी, अशी सूचना डॉ. देशमुख यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.