मंगळवार, १९ मे, २०२०

जिल्ह्यात 41 कोव्हिड केअर सेंटर्स 7253 बेडचे नियोजन : आतापर्यंत 3142 बेड तयार -जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे




 कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय)  : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 41 कोव्हिड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात 3 हजार 142 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात 4 हजार 111 बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग दक्ष आणि सजग असल्याचे स्पष्ट करून डॉ.साळे म्हणाले, जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 41 कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून सुमारे 7 हजार 253 बेड तीन टप्प्यामध्ये आवश्यकतेनुसार तयार करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 3 हजार 142 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. 4 कोव्हिड केअर सेंटरमधून ओपीडी सुरू झाल्याचेही ते म्हणाले.
डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून तीन टप्प्यात 2 हजार 684 बेड निर्माण तयार करण्याचे नियोजन असून आतापर्यंत 1 हजार 80 बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 40 टक्के , दुसऱ्या टप्प्यात 30 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 30 टक्के बेड तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच डेडीकेटेड कोव्हिड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 40 टक्के, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 टक्के, तिसऱ्या टप्प्यामध्ये 30 टक्के असे एकूण 2 हजार 684 बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 1 हजार 80 बेड तयार झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "आयुष" प्रणालीव्दारे जिल्ह्यातील 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संशमनी वटी या आयुर्वेदिक आणि Arsenium Album 30 ही  होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येत आहेत.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून 86 हजार 548 इतर बाधित शहरातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व नोंद करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 22 चेकपोस्ट तयार करण्यात आले असून आतापर्यंत 61 हजार 882 तपासणी करण्यात आल्या. जिल्ह्यात येणाऱ्यांची थर्मल स्क्रिनींगव्दारे तपासणी करण्यात येत असून 1 हजार 761 प्रवाशांना घरी अलगीकरण व 1 हजार 83 प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळा बळकटीकरणावर भर दिला असून संशयीत रूग्णांची तात्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक RT-PCR and CB-NAAT मशिन उपलब्ध झाल्यामुळे तात्काळ निदान होत आहे. यापूर्वी सीपीआर येथे स्वॅब नमुने सुविधा होती. आता तालुकास्तरावर 15 ठिकाणी स्वॅब नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही डॉ. साळे म्हणाले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.