नर्सिंग
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही आरोग्य राज्यमंत्र्यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. २१ ( जिल्हा माहिती कार्यालय)- जिल्ह्यातील कोव्हिड
केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर आणि संस्थात्मक अलगीकरण याठिकाणी शासकीय वैद्यकीय
अधिकाऱ्यांसोबत नियोजन करुन खासगी डॉक्टर्सनीही तालुका निहाय सेवा द्यावी, असे
आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. तर प्रत्येक तालुक्याला डॉक्टरांची
संघटना आहे. त्यानुसार नियोजन करावे. यामध्ये नर्सिंग महाविद्यालयाच्या शेवटच्या
वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग द्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
सामाजिक
बांधिलकीमधून कोव्हिड-19 उचाटनाच्या मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व निम वैद्यकीय
डॉक्टरांची मदत घेण्याबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पालकमंत्री व आरोग्य
राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना काल पत्र
दिले होते. यानुसार आज बैठक घेण्यात आली.
या बैठकीला खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत
देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, जनरल
प्रॅक्टीस असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अशा विविध वैद्यकीय संघटनांच्या
प्रतिनिधींनी एकत्र येवून नियोजन करावे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य
अधिकारी यांनी याबाबत तालुका निहाय त्यांच्या सोईनुसार नियोजन करावे. प्रत्येक
तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक समन्वयक म्हणून
काम करतील.. याबाबत नियोजन करुन आदेश काढावेत त्यानुसार सर्व असोसिएशननी आपली सेवा
द्यावी. केंद्र शासनाने कोव्हिड-19 साठी काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी विमा जाहीर
केला आहे, असेही ते म्हणाले.
शिरोळ तालुक्यामध्ये खासगी डॉक्टर्स
असोसिएशनच्या माध्यमातून सेवा देण्यास सुरुवात झाली आहे, असे सांगून सार्वजनिक
आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, कोव्हिड-19 साठी सेवा देणाऱ्यांसाठी
केंद्र शासनाने विमा जाहीर केला आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी सुरक्षा
साधने निश्चितपणे पुरवली जातील. डॉक्टर बरोबरच पॅरामेडिकल स्टाफही तितकाच महत्वाचा
आहे. त्यासाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी असणाऱ्या
विद्यार्थ्यांनीही आपली सेवा द्यावी, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, डॉक्टर्स
असोसिएशनचे आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे काही प्रतिनिधी एकत्र करुन
जिल्हास्तरावर 24 तास वॉर रुम सुरु करु. याच्या माध्यमातून तालुकास्तरावर आवश्यक
असणाऱ्या केंद्रांसाठी त्या त्या तालुक्यातील डॉक्टरची सेवा देण्याबाबत नियोजन
केले जाईल. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टरांच्या सोईनुसार नियोजन करावे.
जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड
हेल्थ सेंटर, संस्थात्मक अलगीकरण याची माहिती देवून आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचीही
माहिती दिली.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या
अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. ए.एम. शिर्के, केएमएच्या
सचिव डॉ. गीता पिल्लई, डॉ. संजय देसाई, डॉ. दिलीप पाटील, डॉ. महावीर मिठारी, डॉ.
विजयकुमार माने, जीपीएचे अध्यक्ष शिरीष पाटील, एनआयएचएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जगताप, उपाध्यक्ष डॉ. शीतल पाटील
आदी उपस्थित होते.
0 0
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.