सोमवार, २५ मे, २०२०

निवारागृहांसाठी जागा, कुटुंबांची पर्यायी व्यवस्था, वाहतूक, जनावरांच्या छावण्या संभाव्य महापुराची दक्षता म्हणून 3 टप्प्यांत गावनिहाय नियोजन करावे -जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : दरवर्षी पूरबाधित असणारी गावे, गेल्यावर्षी बाधित झालेल्या गावांचे नियोजन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर बाधितांसाठी अतिरिक्त निवार गृहासाठी जागा शोधून नियोजन करावे. संभाव्य बाधित गावातील बाधित कुटुंबांतल्या लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करणे, वाहतुकीचा आराखडा तयार करणे, कुटुंबांसाठी पर्यायी व्यवस्था आदींबाबत गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी  श्री. देसाई यावेळी म्हणाले, दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे बाधित असणाऱ्या गावांतील नागरिकांचे पर्यायी ठिकाणी स्थलांतर, गेल्यावर्षीचे बेंचमार्क लक्षात घेऊन कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी नियोजन करावे. याबाबत वाहतुकीचे नियोजन त्याचबरोबर जनावरांसाठी छावण्या तेथील नियेाजन, कोणकोणत्या सुविधा द्यायच्या याची जबाबदारी निश्चित करून गावनिहाय नियोजन करावे.
 गेल्यावर्षी बाधित झालेल्या वाढीव गावांचे नियोजन करताना कोणत्या केंद्राला कोणी काम करायचे, सामाजिक संस्था, स्वयंसेवक यांना देण्यात येणारी जबाबदारी, बोटी कोठे उपलब्ध ठेवायच्या, याबाबत आदीच नियेाजन करावे, यातही प्रामुख्याने वाहतूक आराखड्याचा समावेश करावा.
गतवर्षी बाधित गावातील काही कुटुंबांनी आपल्या नातेवाईकांकडे जाणे पसंत केले होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हे शक्य होणार नाही. त्यासाठी आतापासूनच त्यांना पर्याय शोधण्यास सूचना द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा, वसतिगृहे सद्या घेण्यात आली आहेत. संसर्ग वाढल्यास कारखान्यांची गोदामे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, त्यांची वसतिगृहे असे पर्यायी जागा निवारा गृहांसाठी आतापासूनच शोधून ठेवावेत. याबाबत, गावनिहाय नियोजन करून तसे सरपंचाना निर्देश द्यावेत असेही  जिल्हाधिकारी म्हणाले.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.