शनिवार, २३ मे, २०२०

जिल्ह्यातील 11 लाख 72 हजार बँक ग्राहकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग विमा योजनांच्या नुतनीकरणास सोमवारपासून प्रारंभ -जिल्हा अग्रणी प्रबधक राहूल माने




कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  जिल्ह्यातील 11 लाख 72 हजार बँक ग्राहकांनी सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा योजनेंत सहभाग नोंदविला आहे, या विमा योजनांच्या नुतनीकरणास येत्या 25 मेपासून विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबधक राहूल माने यांनी दिली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा नुतनीकरण मोहीम जिल्हयात दिनांक 25 मे ते 1 जून 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशामध्ये सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी 9 मे 2015 रोजी सामाजिक सुरक्षिततेच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा या दोन महत्वाकांक्षी योजना सर्व बँकांच्या माध्यमातून गरीब व वंचित घटकांसाठी सुरू केल्या आहेत.
 जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत 7 लाख 80 हजार बँक ग्राहकांनी तर जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 3 लाख 92 हजार बँक ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून यापुढील काळातही जिल्हयातील अधिकाधिक नागरिकांनी त्यांचे बँक खाते असणाऱ्या बँकेत या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू व अपंगत्व यासाठी 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता केवळ बारा रुपये आहे. तर जीवन ज्योती विमा योजना ही नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत विमा संरक्षण देणारी योजना असून वय वर्षे 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेवू शकतात. या योजनेचा वार्षिक हप्ता 330 रूपये आहे.
जिल्हयातील नागरीकांनी आपले बँक खाते ज्या बँकेत आहे, त्या शाखेत, बँकेतर्फे नेमणूक करण्यात आलेल्या व्यवसाय समन्वयक व ग्राहक सेवा केंद्रात अर्ज करावा तसेच पोस्ट बँकेत, पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करता येतो. जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हा अग्रणी प्रबधक राहूल माने यांनी केले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.