मंगळवार, १९ मे, २०२०

माविमच्या बचतगटांनी बनविले ७५ हजार मास्क : जोपासली सामाजिक बांधिलकी - वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे




              कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय):  कोराना प्रतिबंधासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयं -सहाय्यता बचत गटातील महिलांनी ७५ हजार मास्क तयार करून ना नफा ना तोटा या तत्वावर केवळ सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने मास्क वितरीत केले असल्याची माहिती माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली.
कोरोनाला रोखण्यासाठी माविमच्या स्वंय -सहाय्यता महिला बचत गटानी ग्रामीण व शहरी भागात विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीचे काम हाती घेतले असल्याचे सांगून श्री.झिंजाडे म्हणाले, लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विविध कुटुंबामध्ये जाणीव जागृती त्याचबरोबर मानसिक आधार तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रभावी काम केले आहे. तसेच  बचत गट, ग्राम संस्था, वस्तीस्तर संघ व लोकसंचलीत साधन केंद्रांच्या माध्यमातून प्रती महिला १ रुपया प्रमाणे २२ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनी आपल्या कार्यक्षेत्रात गरीब, गरजू  तसेच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी व गरजुंना मोफत जेवण,  गरजूना अन्नधान्य, सॅनिटायझर देखील वितरीत केलेले आहे.  तसेच आवश्यक त्या ठिकाणी सोशल डिस्टंसींगचा अवलंब करून जाणीवजागृती देखील करण्यात आली असून कोरोना काळातही माविमच्या  महिलांची केलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही श्री. झिंजाडे यांनी सांगितले.
00000

       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.