कोल्हापूर,
दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हयाबाहेरुन येणाऱ्या लोकांचा प्रचंड ओघ आणि
तपासणीत रुग्ण पॉझिटिव्हची वाढणारी संख्या विचारात घेऊन जिल्हा, तालुकास्तरावरील
कोव्हिड केअर सेंटर्स आणि गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये मोठया
प्रमाणावर बेड तयार ठेवावेत. गावातील आयक्यूच्या चोख नियोजन आणि नियंत्रणासाठी
जिल्हयात गावनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
जिल्हयात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सद्यस्थितीत कराव्या लागणाऱ्या
प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोनांचा आढावा आणि नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी वेबेक्स व्हीसीव्दारे जिल्हयातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी,
तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी
आणि जिल्हास्तरीय सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गदर्शक सूचना
केल्या. या व्हीसीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, उपमुख्यकार्यकारी
अधिकारी रविकांत अडसूळ यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक गावास संपर्क अधिकारी
नियुक्त करा
जिल्हयात सद्या
कल्पनेपेक्षाही अधिक लोक बाहेरुन विशेषत: रेड झोनमधून येत आहेत, तसेच स्वॅब
तपासणीतही रुग्ण पॉझिटिव्हचे प्रमाणही अधिक आहे, या गोष्टी विचारात घेऊन जिल्हयात
सामुहिक संसर्ग होणार नाही, याची खबरदारी आतापासूनच घेणे गरजेचे असल्याचे सागून जिल्हाधिकारी
दौलत देसाई म्हणाले की, गावात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबाबत गावातील
ग्रामसमितीने अतिशय दक्ष राहून कोरोना प्रतिबंधक कार्यवाही जबाबदारीने आणि नेटाने
पार पाडावी,गावातील कोरोना प्रतिबंधक कामात योग्य नियोजन, सुसूत्रता आणि सनियंत्रण
रहावे, यासाठी जिल्हयातील प्रत्येक गावात संपर्क अधिकारी नियुक्त करा, यासाठी आजच
नियोजन आराखडा तयार करुन लागलीच कार्यवाही सुरु करण्याची सूचनाही त्यांनी केली. या
संपर्क अधिकाऱ्यांनी संबंधित गावांना दररोज भेट देऊन क्वॉरंटाईनची यंत्रणा अधिक
दक्ष करणे गरजेचे आहे.
ग्रामस्तरीय संस्थात्मक
अलगीकरणातील लोकांचे तीन प्रकारात वर्गीकरण करा
यापुढील काळात
बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
ग्रहीत धरुन ग्रामस्तरावरील संस्थात्मक अलगीकरण व्यवस्थेबरोबर अतिशय दक्ष
राहण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी म्हणाले, ग्राम समितीने गावांतील संस्थात्मक
अलगीकरण केंदामध्ये दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांचे तीन प्रकारात वर्गीकरण करुन
त्यांच्या राहण्याची व शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करावी, जेणेकरुन सामुहिक
संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. या वर्गीकरणामध्ये ज्यांचे स्वॅब निगेटिव्ह आलेले
आहेत असे लोक, ज्यांचे स्वॅब घेतलेले आहेत पण अहवाल आलेला नाही, असे लोक, आणि अद्याप
ज्यांचे स्वॅब घेतलेले नाहीत, असे वर्गीकरण करुन त्यानुसार संबंधितांना संस्थात्मक
अलगीकरण केंद्रातच राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र
शौचालय उपलब्ध करुन देण्याबरोबरच प्रत्येकाची आयक्यू सेंटरमध्ये जागा निश्चित करुन
देण्याची सूचनाही त्यांनी केली. याबरोबरच ग्रामस्तरावरील संस्थात्मक आणि गृह
अलगीकरण केंद्रामधील लोकांची आरोग्य विभागामार्फत आशा अथवा आरोग्य
कर्मचाऱ्यांमार्फत दिवसातून दोन वेळा आवश्यक तपासणी करुन कोणाली कोरोनाची लक्षणे
आढळल्यास कोव्हिड केअर सेंटरला तात्काळ पाठविण्याची कार्यवाही करावी, अशी सूचनाही
त्यांनी केली.
लक्षणे आढळणाऱ्यांची आणि पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब बंधनकारक
जिल्हयात बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी करुन कोरोनाची
लक्षणे आढळणाऱ्या आणि ज्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत, पण ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या
संपर्कात आलेले आहेत, अशांचे स्वॅब घेणे बंधनकारक केले असल्याचे सागून जिल्हाधिकारी म्हणाले,
जिल्हयाबाहेरुन येणाऱ्या उर्वरित संशयित लोकांना संस्थात्मक अलगीकरण दाखल केले
जाईल, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्यात
येणाऱ्यांची जेवण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेबाबतची चोख व्यवस्था करण्याची दक्षता
घ्यावी, गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण
केंद्रांमध्येही गावकरी, ग्रामपंचायत आणि सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने
सर्वती व्यवस्था करावी.
तालुकास्तरीय कोव्हिड केअर
सेंटर्समध्ये आता संगणकप्रणाली
तालुकास्तरीय
कोव्हिड केअर सेंटर्स आणि संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्येही आता संगणकप्रणाली
बसविण्यात येणार असून कोरोना संदर्भातील माहिती, डाटा संकलित होणार असल्याने नियोजन
आणि नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. तालुकास्तरीय कोव्हिड केअर सेंटरच्या
नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा तसेच प्रत्येकावर स्वतंत्रपणे कामाची
जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केली. गावातील
गृह अलगीकरण केलेल्या लोकांच्या घराच्या दारावर गृह अलगीकरणाबाबच्या माहितीचे
स्टिकर लावा, जेणेकरुन इतर लोकही जागरुक राहतील.
गावांत स्वच्छता आणि जंतुनाशक
फवारणी हाती घ्या
महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यावेळी म्हणाले, ग्रामस्तरावरील संस्थात्मक अलगीकरण
केंद्रामधील लोकांचे तीन प्रकारात वर्गीकरण करा तसेच या केंद्रामधील वर्गीकरण
केलेल्या लोकांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध करुन द्या, गावात वारंवार जंतुनाशकांची
फवारणी करा, तसेच गृह अलगीकरण केलेली व्यक्ती घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास
त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. याकामी प्रशासन तुमच्या पाठीशी
सर्वशक्तीनिशी उभे आहे, अशी ग्वाहीही डॉ. कलशेट्टी यांनी दिली.
रोग प्रतिकारक शक्ती
वाढविण्यासाठी होमिओपॅथी गोळया
जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, जिल्हयातील 50 व
त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष
मंत्रालयाने सूचविल्यानुसार होमिओपॅथी गोळया तालुकास्तरावर देण्यात येत असून या
गोळयांचे वाटप तात्काळ करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गटविकास
अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून आतापासूनच नियोजन करावे.
घाबरुन जाऊ नका पण
आत्मविश्वासाने काम करा
यावेळी जिल्हा
पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी पुरवठा विभागामार्फत लोकांना देण्यात
येणाऱ्या धान्य तसेच डाळीबाबतच्या शासन आदेशाची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री.
देसाई यांनी व्हीसीतील सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी अशा सर्वांच्या अडचणी
जाणून घेऊन त्यांच्या निराकरणाबाबतही संबंधितांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
ते म्हणाले , कोरोनावर आपण निश्चितपणे मात करु, रुग्ण पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे,
मात्र कोणीही घाबरुन जाऊ नये पण आत्मविश्वासपूर्वक काम करुन कोरोनाचा सामूहिक
संसर्ग होणार नाही, याची दक्षता आणि खबरदारी घेऊया.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.