बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

पोलीस, भरारी पथक आणि एसएसटीचे इचलकरंजीत संयुक्त छापे 1 लाख 83 हजार 871 रुपयांचा मुद्देमाल जप्त



            कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) :  इचलकरंजी गावभाग पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आणि एसएसटी (स्थिर निरीक्षण पथक) यांनी इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात 16 ठिकाणी आज छापे घातले. या कारवाईत अवैध दारुसाठीचे साहित्य, देशी, विदेशी मद्य साठा असा एकूण 1 लाख 83 हजार 871 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
            विधानसभा निडणूक आचारसंहिता आणि आजच्या ड्राय डे च्या दिवशी इचलकरंजी मधील शांतीनगर परिसरात  16 ठिकाणी घातलेल्या या छाप्यात अवैध दारु निर्मितीसाठी लागणारे पक्के, कच्चे रसायन, तयार हातभट्टी दारु नाश करण्यात आली. विविध ब्रँडचे देशी मद्य, विदेशी मद्य, बिअर, 240 किलो अखाद्य गुळ, फ्रिज, इलेक्ट्रीक वजन काटा जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आदींचा समावेश आहे.
          गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, निरीक्षक पी.आर.पाटील, ए.पी.मते जिल्हा भरारी पथकाचे निरीक्ष्‍ाक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक एस.आर.कोरे, अतुल पाटील, स्थिर निरीक्षण पथकाचे प्रमुख पवन म्हेत्रे, बाबाजान जमादार यांच्यासह  60 अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत किरण गणपती चव्हाण, नानासाहेब नारायण साळवे, गीता संजय गागडे, बबलू विजय मिणेकर, गणेश विष्णू माछरे, निर्मला माणिक गागडे, मधुकर गणपती पुजारी, चंद्रकांत मधुकर नगरकर ( फरारी), मीन विष्णू नेतले (फरारी) सर्व राहणार शांतीनगर इचलकरंजी यांच्या विरुध्द गुन्हे नोंद केले आहेत. 
          अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई यापुढे करण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
 0 0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.