कोल्हापूर,दि. 9 (जि.मा.का.) : पोवाडा, पथनाट्य आणि घोषवाक्य यांच्या
जोडीला हजारो विद्यार्थ्यांनी आज सकाळी बिंदू चौकात मानवी साखळी करून "I will
vote" चा संदेश देत मतदार जनजागृती केली. आम्ही मतदान करणार हा निर्धार यावेळी
उपस्थित मतदारांनी हवेमध्ये फुगे सोडून केला.
21
ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा
प्रशासन आणि सकाळ समुह माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने "I will vote" हा
संदेश देण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन केले,
या मानवी साखळीमध्ये शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, राष्ट्रीय स्वयंसेवक,राष्ट्रीय
छात्र सेना, विविध तालीम मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी
- सदस्य यांच्यासह नागरिकांनी विशेषत: नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बिंदू
चौकाच्या चारी दिशांनी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आल्याने चारही मार्गांवर विद्यार्थ्यांच्या
मोठ-मोठ्या मानवी साखळी निर्माण झाली होती. त्यानंतर बिंदू चौकात चारही बाजूंनी मानवी
साखळीतील सहभागी नागरिक आणि विद्यार्थी एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने मतदान जागृतीचा
जागर झाला.
मतदान
जागृतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे लोकशाही बळकटीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेल्या
"I will vote" या मानवी साखळीनिमित्त जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, चित्रपट अभिनेते
आनंद काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलांडे,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल
पंडितराव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन
देसाई, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.
सर्वांनी मतदान करा-जिल्हाधिकारी
जिल्ह्यामध्ये 30 लाख 90 हजार मतदार आहेत.
सर्वांनी 100 टक्के मतदान करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा,असे आवाहन करून जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी उपस्थितांना मतदान प्रतिज्ञा दिली.
'आम्ही भारताचे
नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याव्दारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण
वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपयणे तसेच धर्म,वंश,जात,भाषा
यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान
करू.' ही प्रतिज्ञा यावेळी सर्वांनी घेतली.
मराठी
चित्रपट अभिनेते आनंद काळे यावेळी म्हणाले, आपलं स्वत:चं मत मांडण्यासाठी मतदान करा.
100 टक्के मतदान व्हावे यासाठी युवकांनी आपल्या सोशल मीडियावरून जनजागृती करावी.
लोकशाही
बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहीजे, असे सांगून महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या 21 ऑक्टोबर रोजी
विधानसभा निवडणुकीसाठीही मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहीजे. त्यासाठी जनजागृती करा.
संपादक श्रीराम पवार यावेळी म्हणाले,
लोकसभेला राज्यात सर्वाधिक मतदान आपल्या जिल्ह्यात झाले होते. याही वेळेला राज्यात
सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा आपला असावा. त्यासाठी अधिकाधिक मतदान होण्यासाठी सर्वांनी
जनजागृती करावी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सतसद् विवेकबुध्दीने मतदान करा.
महापालिकेच्या
शिक्षण समितीतर्फे तसेच शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करण्यात
आले. यावेळी जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी मतदान जागृतीपर पोवाडा सादर केला. तसेच उपस्थितांना
मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी पदाधिकारी,
अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.