कोल्हापूर दि. 21 (जि.मा.का.) :- कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलिस प्रशासनाच्यावतीने
स्मृतिस्तंभावर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव
देशमुख यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑगस्ट 2019 या कालवधीत देशातील 292 पोलीस अधिकारी व कर्चचारी कर्तव्य बजावत असताना
शहीद झाले आहेत. यामध्ये राज्यातील 1 पोलीस उपनिरीक्षक, 1 सहाय्यक फौजदार, 1 पोलीस
हवालदार, 1 पोलीस नाईक व 16 पोलीस शिपाई अशा 20 जणांचा समावेश आहे. पोलीस दलाच्यावतीने
बंदुकीच्या 3 फैऱ्यांची सलामी आणि पोलीस बँड पथकाने बिगूल वाजवून मानवंदना दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक
डॉ. वारके आणि पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनाचे महत्व
सांगून शहिदांना आदरांजली वाहिली. 20 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे केंद्रीय राखीव दलाचे
2 जवान हरवले होते. त्यांचा शोध घेण्याकरिता आयटीबीपी आणि केंद्रीय राखीव दलाच्या
22 जणांची 1 तुकडी 21 ऑक्टोबर रोजी गेली होती. या तुकडीवर हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी
चिनी सैनिकांनी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात
शोध तुकडीतील 10 जवान मृत्यूमुखी पडले, 5 जवान जखमी झाले तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी
ताब्यात घेतले. शत्रूशी निकराची लढत देताना हे शूरवीर देशासाठी
शहीद झाले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
आजच्या दिवशी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागील
1वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण
आले त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
पोलीस कवायत क्रीडांगणावर
आज सकाळी झालेल्या स्मृती दिन कार्यक्रमात गतवर्षी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे वाचण्यात आली. पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून सलामी देण्यात आली.
पोलीस बँड पथकाच्यावतीनेही मानवंदना देण्यात आली.
यानंतर स्मृतीस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना
अदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय,निवृत्त
पेालीस अधिकारी, तसेच नागरिक यांनीही गुलाब पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.