बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

शासनाच्या विविध योजनांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा -डॉ. मिनाक्षी गजभिये



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) :  ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.  विशेषत: दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी केले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मार्फत येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या सभागृहात काल ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 150 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,उपअधिष्ठाता डॉ. अजित लोकरे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरूळकर, प्रा.डॉ. मानसिंग जगताप, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. बाळासाहेब कामत, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, एस.टी. महामंडळाच्या सवलत विभाग प्रमुख निलम नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले.  2-3 महिन्यातून प्रत्येक विभाग प्रमुखाकडे जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक घेऊ आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती घेऊ. ज्येष्ठ नागरिकांनी लिखाण करावे आणि त्याची प्रसिध्दी करावी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यावेळी म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना योग्य व वेळेवर उपचार मिळणे या वयात आवश्यक आहे. शासन त्यांच्यासाठी मोफत सुविधा देत आहे, त्याचा लाभ घ्यावा.
डॉ. साळे यावेळी म्हणाले, दर बुधवारी 4 ते 6 या वेळेत ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. या योजनेला आधारवड हे नाव दिले असून गेल्या वर्षी 4 हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी यावेळी व्यायामाचे महत्व सांगितले तर श्रीमती नाईक यांनी स्मार्ट कार्ड योजनेची माहिती दिली. प्रास्ताविक अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.
डॉ. जगताप यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये सहा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रत्येक जिल्ह्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रूग्णालय असावे. त्यासाठी स्वतंत्र बजेटही असावे. ज्येष्ठ नागरिकांना भरपूर रिकामा वेळ असतो त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आम्ही शासनाला मदत करू असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार प्रदर्शन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक संजय पवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक के.बी.जोशी, तालुका समन्वयक सचिन कांबळे, सहायक लेखाधिकारी ए.जे.रंगापुरे, समाजसेवा अधीक्षक शशिकांत वाघमारे, महेंद्र चव्हाण, अशोक वाघोळे यांनी आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.