कोल्हापूर दि. 18 (जि.मा.का.) :- मतदार
संघातील मतदान केंद्रावर आणि कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सर्व
सुविधा पुरवा. त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.
येथील शासकीय
विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांची
पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला सर्व साधारण निवडणूक निरीक्षक
अमर नाथ आर तलवडे, महापालिका
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी
नंदकुमार काटकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ
गलांडे आदी उपस्थित होते.
मतदानाची
पूर्व तयारी, कायदा व सुव्यवस्था, आचरसंहिता अंमलबजावणी, मतदार कर्मचाऱ्यांची वाहतूक
व्यवस्था, दिव्यांग मतदरांबाबत सुविधा, कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, मतमोजणी केंद्रावरील
आवश्यक सुविधा, स्ट्राँग रुम, मतदार चिट्टी वाटप, सुरक्षा, वेब कास्टींग, चित्रीकरण,
इंटरनेट, दूरध्वनी सुविधा आदी बाबत मतदार संघ निहाय जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी
सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यावेळी म्हणाले, मतदान केंद्रावरील ज्या सुविधा अद्याप बाकी राहिल्या असतील
त्या पुरवा त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल द्यावा. विशेषत: दिव्यांग
मतदारांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत काळजी घ्यावी. मतदान केंद्रांवर नियुक्त
असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सुविधांबाबतही विशेष लक्ष द्या. काही समस्या निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क करा.
त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी कडक कारवाई करा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या. निवडणूक निरीक्षक श्री. तलवडे यांनीही यावेळी पूर्व
तयारीबाबत समाधान व्यक्त करुन पुढील तीन दिवस योग्यती खबरदारी घेण्याविषयी सांगितले.
0 00 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.