मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

राशिवडे व चांदे रस्त्यावर 100 हून अधिक मृत कोंबड्यांची बातमी अफवा - पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.पठण

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : राशिवडे व चांदे रस्त्यावर 100 हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्याबाबत वृत्त ही सपशेल अफवा असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.एस.पठाण यांनी दिली.

राशिवडे  व चांदे रस्त्यावर 100 हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्याबाबत दै. तरूण भारतचे  वार्ताहर रंगा लाड यांनी व्हॉटस् ॲप न्यूजव्दारे बातमी पसरवली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण, पशुधन पर्यवेक्षक सुनिल काटकर आणि हसूर दुमाला येथील पशुधन पर्यवेक्षक यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट देऊन शहानिशा केली असता तेथे चिकन सेंटरवरील कोंबडीची पिसे, एका मृत कोंबडीचा कुजलेला सांगाडा व एक पांढरे बारदान आढळून आले. हे बारदान उघडून रिता केले असता बारदानामध्ये घरातील कचरा, पत्रावळी, द्रोण, चहाचे कप, नारळाच्या शेंड्या इ. साहित्य आढळून आले.

          रात्री 1.20 वा. राशिवडेच्या सरपंचांना घेवून पंचनामा करून वस्तुस्थितीचा व झालेल्या वृत्तांकनाचा खोटारडेपणा निदर्शनास आणून दिला. परिसरात पसरलेली घाण तात्काळ साफ करण्याबाबत निर्देश देण्यात आले. परिसरातील कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट देवून रोगराई संदर्भात तपासणी व प्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यात सांसर्गिक रोग निर्मूलन समिती कार्यरत असून पशुसंवर्धन विभागामार्फत पक्ष्यांमधील रोगराई संदर्भात रोग नमुने पाठवून शहानिशा केली जाते. पशुसंवर्धन विभाग शेतकरी, पशुपालक व जनमानसात प्राण्यांपासून होणाऱ्या रोगाबाबत दक्ष असतो. तरी यापुढे प्राण्यांच्या रोगासंदर्भात वृत्तांकन करताना पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शहानिशा करावी, असे आवाहनही श्री. पठाण यांनी केले आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.