गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

शिष्यवृत्ती अप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रस्ताव 14 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सन 2016-17 व 2017-18 या कालावधीसाठी अर्ज भरूनही लाभ अप्राप्त असल्याबाबत आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. या कालावधीत शिष्यवृत्ती अप्राप्त असल्यास विद्यार्थ्यांनी बँकेविषयी आवश्यक तपशिल आपल्या महाविद्यालयास पुरवावा. महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव 14 जानेवारीपर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागामार्फत सन 2016-17 व 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर निर्वाह भत्ता व परीक्षा शुल्कची रक्कम वर्ग केलेली आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांची रक्कम बंद खाते क्रमांक, चुकीचा बँक अकाऊंट नंबर इ. कारणांमुळे बँक स्टेटमेंटनुसार परत आलेची दिसते. त्यातील काही विद्यार्थ्यांची रक्कम कार्यालयाने पुनश्च वर्ग केलेली आहे. त्यामुळे याबाबत महाविद्यालयाने आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही करून आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व परीक्षा फिची एकत्रित रक्कम मिळाली आहे का याची खात्री करून अशा लाभ अप्राप्त विद्यार्थ्यांची यादी कार्यालयास सादर करावी.

 ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती पुनश्च वर्ग करण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना वगळून सोबतच्या ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही अशाच विद्यार्थ्यांचे योग्य खाते क्रमांक व आयएफसी क्रमांक विहित केलेल्या नमुन्यात हार्ड कॉपी व सॉफ्टकॉपी स्वरूपात समाज कल्याण कार्यालयास सादर करावी. सोबत विद्यार्थ्यांचे आजच्या तारखेपर्यंतची अद्यावत केलेली बँक पासबुकची झेरॉक्स, जुने खाते बंद असल्यास त्याबाबत संबंधित बँकेचे पत्र, नवे खाते सुरू केले असल्यास त्याची झेरॉक्स व आले प्रमाणपत्र सादर करावे. याबाबत महाविद्यालय स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्यात यावी.

 समाज कल्याण विभागाकडून महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांना अंतिमत: अवगत करण्यात येत आहे. याबाबत विहीत वेळेनंतर केला जाणारा कोणताही पत्रव्यवहार कार्यालयाकडून विचारात घेतला जाणार नाही याची विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.