जिल्ह्यात 4 हजार 598 जणांना लसीकरण
नव्या उद्योगात 261.6 कोटींची गुंतवणूक 4 हजार 927 रोजगार निर्मिती
-पालकमंत्री सतेज
पाटील
कोल्हापूर, दि. 26
(जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील
सर्व नागरिक, सेवाभावी संस्था, प्रशासन, विशेषत: आरोग्य विभाग, सर्वच
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. सर्व कोरोना योद्यांनी अहोरात्र प्रयत्न करून जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न
केला आहे ‘आम्ही कोल्हापूरी जगात भारी’ ही उक्ती सार्थ ठरविली आहे. जिल्ह्याचे
कोरोना रिकव्हरी प्रमाण 96.4 टक्के असून जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत 4 हजार 598 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात नव्या उद्योगात
261.6 कोटींची गुंतवणूक झाल्याने 4 हजार 927 रोजगार निर्मिती होणार आहे, असे
प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी करून प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन
दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर पालकमंत्री सतेज पाटील
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रभारी विशेष पोलीस
महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.
कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश
बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी
–कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपस्थित स्वातंत्र्य सैनिक-कुटुंबियांना पालकमंत्र्यांनी
गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरानाविरूध्द लढण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कोरोना केंद्र, आरोग्य केंद्रे व रूग्णालये
शासकीय व खासगी सहकार्यातून आस्थापित केली. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची
चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, यासाठी सर्व
अधिकारी-कर्मचारी, नागरिकांनी सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. संशयीत
रुग्णांच्या तत्काळ तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक RT-PCR and CB-NAAT मशिन सर्व प्रथम उपलब्ध केले. आज अखेर 3 लाख 26
हजार 773 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 49 हजार 857 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार
76 जणांना जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 96.4 टक्के इतके रिकव्हरीचे प्रमाण
असून राज्यात जिल्हा अव्वल स्थानावर आहे.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात 15
हजार 500 इतक्या रेमडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करणारा राज्यात कोल्हापूर हा
एकमेव जिल्हा आहे. जिल्हयात 10 हजार किटचे
वाटप करुन गंभीर अजारी नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले. सीपीआर, आयजीएम
इचलकरंजी, गडहिंग्लज रुग्णालयात Central liquid oxygen system विक्रमी वेळेत
बसविण्यात आले. सर्व कोवीड केअर केंद्राना औषधी, साधनसामुग्री पुरवठा
करुन प्रभावी उपचार केले. जिल्ह्यातील 50 वर्षे पेक्षा जास्त वय असणा-या व्याधीग्रस्त
लोकांना आयुष अंतर्गत सर्व्हेक्षण करुन प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संशमनी वटी व अर्सेनीक
अल्बम-30 हे औषध वाटप करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला
असल्याचेही ते म्हणाले. कोव्हिड बाधित रूग्णांवर उपचारासाठी युध्दपातळीवर 53
कोव्हिड काळजी केंद्रे, 12 समर्पित कोव्हिड हेल्थकेंद्रे व 5 समर्पित कोवीड
रूग्णालयांची उभारणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला यांनी
मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने जगात पहिल्यांदा कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती
केली आहे. या लसीमुळे मानवी जीवन पूर्ववत होऊन मानवाला सुखाने जीवन जगता येईल.
हैदराबादची भारत बायोटेक आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट या दोन्ही संस्थांचे
राज्य शासनाच्यावतीने पालकमंत्री श्री. पाटील यांनी आभार व्यक्त करून या
संस्थांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम पहिल्या टप्यात सुरु झाली असून
उर्त्स्फूत प्रतिसादही मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोवीशिल्डच्या लसीकरण मोहिमेत
जिल्ह्यातील 4 हजार 598 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट
करण्यावर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेस नुकत्याच 39 अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, छत्रपती
शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची
वाटचाल सुरु आहे. राज्य
शासनाने आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख
रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजना" आणून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. या योजनेचा लाभ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 30 हजार 808 शेतकऱ्यांना 154 कोटी 68 लाखावर तर
अन्य बँकांच्या 16 हजार 154 शेतकऱ्यांना 124 कोटी 85 लाखावर रक्कमेचा लाभ देण्यात
आला. जिल्हयातील शेतकरी, शेतमजुर, कामगार, उद्योजक, व्यापारी तसेच
जिल्हावासीयांच्या सर्वांगिण विकासावर शासनाने सर्वाधिक भर दिला आहे.
कुळ कायद्याच्या
बंधनातील 25 हजार एकर पेक्षा जास्त जमीन बंधमुक्त
जनतेला त्यांच्या महसूल विषयम कामासाठी
जिल्हास्तरावर वारंवार येणे लागू नये यासाठी महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान राबविले जात आहे. या महसुल जत्रेत 116 विषयांची नागरिकांची कामे
पारदर्शक पध्दतीने व प्राधान्याने करण्याचा संकल्प असून त्यास फार मोठ्या
प्रमाणावर नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे व हजारो एकर जमिनींची निर्विवाद मालकी
खातेदारांना मिळत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर कुळ कायद्याच्या बंधनातील 25 हजार एकर पेक्षा जास्त जमीन बंधमुक्त
झाली. बाळिघोलच्या जमीनीही बंधनातुन मुक्त झाल्या. गावठाणचे भूखंडाची मालकी
नागरिकांची होऊ लागली. या अभियानाचा जास्तीत-जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा, असे
आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
पोलीस ठाण्यांचे अत्याधुनिकीकरण
जिल्ह्याच्या विकासाचा
केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा वार्षिक
योजना आराखड्याच्या प्रभावी
अंमलबजावणीवर शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून यंदा जिल्हा वार्षिक योजना
आराखड्यानुसार उपलब्ध निधी 100 टक्के येत्या मार्चअखेर खर्च
करण्याचे नियोजन केले आहे. सन 2021-2022 साठी सर्वसाधारण
योजनेसाठी
365 कोटी 85 लाखाची तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 116 कोटी 60 लाखाचा
आणि ओटीएसपी योजनेसाठी 161 कोटी 46 लाखाचा आराखडा तयार करण्यात आल्याचे पालकमंत्री
श्री. पाटील म्हणाले. जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यापैकी
15 पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक करण्याच्या
दृष्टीकोनातून निधी जिल्हा नियोजन समितीतुन मंजुर केला आहे. महापालिका
हद्दीत हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन आणि सुसज्ज
स्मारकाची उभारणी नाविन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे. झोपडपट्टीमुक्त
महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आला असून बांधकाम परवाने
देण्याचे काम गतीने होणार आहे. यातून
बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.
दिव्यांगांना थेट अनुदान
जिल्ह्यातील पात्र 24 हजार 833 दिव्यांगांना मंजूर
अनुदानातून प्रत्येक लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी 350 प्रमाणे मंजूर
केले असून हे अनुदान डी.बी.टी.द्वारे संबंधितांच्या बँक खात्यावर ग्रामपंचायती
मार्फत वर्ग करण्याची कार्यवाही करणारा कोल्हापूर
जिल्हा राज्यात एकमेव आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून 89 लाख 52 हजार 161
इतकी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच 18 वर्षावरील दिव्यांगांचा आर्थिक स्तर
उंचावण्यासाठी 1 कोटी 5 लाख 61 हजार 300 इतकी तरतुद करण्यात आली आहे.
खरीप
पीक वाटपात जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर
राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019
या काळात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थतीत बाधित झालेल्या 1 लाख 2 हजार 474
शेतकऱ्यांना 306 कोटी 93 लाख 67 हजाराचा लाभ देण्यात आला.
गेल्या डिसेंबरअखेर जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत,
खासगी आणि ग्रामीण बँकामार्फत जिल्हयातील 2 लाख 1 हजार 896 शेतकऱ्यांना 141 कोटी
21 लाखाचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्हयात खरीप पीक कर्ज वाटप 159 टक्के झाले असून खरीप
पीक वाटपामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
गेल्यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ
महिन्यात 24 लाख 58 हजार 140 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 किलो प्रमाणे 97 हजार
505 मे. टन इतका गहू आणि तांदूळ दरमहा
मोफत उपलब्ध करुन दिला आहे. त्याचप्रमाणे मे, जून व जुलै 2020 या तीन महिन्यासाठी
केशरी शिधापत्रिका धारकांना 13 हजार 689
मे.टन गहू व तांदूळ सवलतीच्या दरात वाटप करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या
लॉकडाऊन कालावधीत गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली नाही.
सुमारे
10 लाख लोकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद
शिवभोजन
योजना अंमलात येवून 1 वर्ष पूर्ण झाले असून एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात
37 शिवभोजन केंद्रे सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांनी शिव भोजन
थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना परिस्थितीमुळे सद्या फक्त 5 रूपयामध्ये ही थाळी
देण्यात येत असून शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा समाजातील तळागाळातील व
गोरगरीब जनतेस निश्चितपणे फायदा होत आहे.
मजुरांची कमतरता लक्षात घेता शेतीची कामे
वेळेत पूर्ण होण्यासाठी यांत्रिकीकरणाचे महत्व अनन्य साधारण आहे. जिल्ह्यात कृषी
यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 1004 लाभार्थ्यांना विविध यंत्रांचा लाभ देण्यात आला
असून सुमारे 7 कोटी 45 लाख रूपये अनुदान स्वरूपात वितरीत करण्यात आलेले आहेत. या
योजनेमध्ये 238 ट्रॅक्टर, 150 पॉवर टिलर, 204 रोटाव्हेटर, 170 पॉवर विडर, 163
पल्टी नांगर व 79 इतर अवजारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गटशेती अंतर्गत 100 एकर क्षेत्र
असलेले 13 गट मंजूर असून त्यांना त्यांच्या विविध उत्पादन प्रक्रिया प्रकल्पांसाठी
7 कोटी 50 लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत. यामध्ये दुग्ध प्रक्रिया, भात,
भाजीपाला, गूळ, नाचणी इ. प्रकारच्या उत्पादनांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत जिल्ह्यात 1400 शेतकरी लाभार्थ्यांकडे
सूक्ष्म सिंचन संच बसविण्यात आलेले असून त्यासाठी 3 कोटी 78 लाख रूपये अनुदान
स्वरूपात वितरीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 789 हे. क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली
आलेले आहे. मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत 37 विविध प्रकारचे प्रक्रिया
प्रकल्प मंजूर झाले असून त्यांना सुमारे 5 कोटी रूपये अनुदान स्वरूपात वितरीत
झालेले आहेत. यामध्ये काजू, नारळ, नाचणी, बटाटा चिप्स व गुळ इत्यादी प्रक्रिया
प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सुमारे 72 हजार 800 हेक्टर
पूरग्रस्त पीक नुकसान क्षेत्रासाठी 135 कोटी रूपयांची मदत वाटप करण्यात आलेली असून
सन 2020-21 वर्षातील अवकाळी पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी रूपये
3 कोटी 24 लाख निधी मंजूर झालेला आहे व वाटप सुरू आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व
पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमधून सावरण्यासाठी ही मदत शेतकऱ्यांना
नवसंजीवनी ठरली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या
नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1 लाख 19 हजार 123
बायोगॅस संयंत्रे बांधून महाराष्ट्रात दरवर्षी सातत्याने प्रथम क्रमांक मिळविला
असून देशातही अव्वल स्थान कायम राखले आहे.
राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते
6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करुन जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील 15 गावांना संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे. राधानगरी
अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत निश्चित
केला. त्यामुळे राधानगरी अभयारण्यापासून
10 किलो मीटरच्या गावांमध्ये असणाऱ्या
बंधनापासून थोडी सुटका मिळाली आहे.
गव्यांसाठी
प्रसिध्द असलेले राधानगरी- दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटनदृष्टया
विकसित करण्यासाठी 110 कोटीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी
दिली आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक
सन्मान योजनेचा 18 हजार 178 लाभार्थींना लाभ
महाराष्ट्र राज्यात दीर्घ काळापासून वास्तव्यास असणाऱ्या संरक्षण दलातील माजी
सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी यांच्याकरिता महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे
माजी सैनिक सन्मान योजना सुरू केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील 12 हजार 677 माजी
सैनिक आणि 5 हजार 501 माजी सैनिक विधवा असे एकूण 18 हजार 178 लाभार्थींना
त्यांच्या मालमत्ता करारातुन सूट मिळणार आहे.
कृषीपंप वीज ग्राहकाला मागणीप्रमाणे वीज
जोडणीचा पर्याय
महाराष्ट्र
राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून उर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक
कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून
देण्यासाठी नवीन वीज जोडणी धोरण -2020 जाहीर केले आहे.
कृषी
ग्राहकांना दिवसा अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पांची उभारणी
करण्यात येणार असून याकरिता स्वतंत्र ऑनलाईन लँड बँक पोर्टल तयार करण्यात आलेले
आहे. याकरिता 33/11 केव्ही उपकेंद्रापासून 5 किमी च्या परिघामध्ये शासकीय/गायरान/
खासगी जमीन उपलब्ध असल्यास तेथे सौर कृषी प्रकल्पाची उभारणी करून त्याव्दारे
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा दिला जाणार आहे.
कृषीपंपाच्या
वीज बीलातही सवलत देण्यात येत असून त्यानुसार प्रथम वर्षी सुधारित संबंधित कृषीपंप
ग्राहकाला चालू बील भरणे क्रमप्राप्त राहील आणि चालू बिल न भरल्यास वीजपुरवठा
खंडीत होऊ शकतो. ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी 3 वर्षाची सवलत देण्यात आली
असून या धोरणांतर्गत सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा
वापर करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत पातळीवर वीज बिल भरण्याची
सुविधा देण्यात आली असून ग्रामपंचायतींना वीज बील वसुलीसाठी प्रती पावती रू. 5
मोबदला, कृषीपंप ग्राहकांकडील वसूल केलेल्या थकबाकीच्या 30 टक्के मोबदला, चालू
वीजबील वसुल केल्यास 20 टक्के मोबदला यासारख्या अनेक प्रोत्साहनपर बाबी अंतर्भूत
केलेल्या आहेत.
अकृषक
ग्राहकांची वीज बिले भरण्याचीदेखील सुविधा देण्यात आली आहे. त्यात वसूली
कार्यक्षमतेनुसार ग्रामपंचायतींना 20 टक्के पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात
येणार आहे.तसेच ग्राम विद्युत व्यवस्थापक गाव पातळीवरील सहकारी संस्था, महिलांचा
स्वयं सहाय्यता गट इत्यादींना वीज बील वसुलीचे काम देण्यात येणार असून
त्यांनादेखील प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
तसेच
ग्राम विद्युत व्यवस्थापक गाव पातळीवरील सहकारी संस्था, महिलांचा स्वयं सहाय्यता
गट इत्यादींना वीज बील वसुलीचे काम देण्यात येणार असून त्यांनादेखील प्रोत्साहनपर
रक्कम देण्यात येणार आहे
भारतीय
प्रशासन सेवेमध्ये ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळावी यासाठी कोल्हापूर येथे
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कार्यक्षमतेने चालविले जात आहे. या
केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान कक्ष, अभ्यासिका, ग्रंथालय अशा आवश्यक
सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन 2011 पासून 2021 पर्यंत या केंद्रातून 6
आयएएस, 7 आयएफएस, 4 आयपीएस तर इतर सर्व्हिसेसमध्ये 16 विद्यार्थ्यांनी यश मिळविले
आहे. या केंद्रसाठी सन 2019-20 मध्ये 76 लाख 96 हजार इतका निधी उपलब्ध झाला आहे.
नव्या उद्योगात 261.6 कोटींची
गुंतवणूक असून यामुळे 4 हजार 927 रोजगार निर्मिती
जिल्ह्याचा
औद्योगिक विकास व्हावा. तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नवीन औद्योगिक
वसाहती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन
करून या वसाहती विकसित करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात आज घडीला 6 एमआयडीसी आणि 1
आयटी पार्क कार्यरत आहे. सन 2019-20 मध्ये 3 हजार 640 उद्योग घटकांची संख्या असून
नव्याने 35 उद्योगांची संख्या वाढली आहे. या नव्या उद्योगात 261.6 कोटींची
गुंतवणूक असून यामुळे 4 हजार 927 रोजगार निर्मिती होणार आहे.
दिव्या संकपाळ खेलो इंडिया स्पर्धेत देशात प्रथम
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याने नेहमीच नेत्रदिपक यश मिळविले
आहे. दि 10 जाने ते 22
जाने 2020 या कालावधी आसाम येथे 3ऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत राज्याने 78 सुवर्ण ,
77 रौप्य ,101 ब्रॉंझ असे एकूण 256 पदके मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला यामध्ये
कोल्हापूर जिल्ह्यातील 53 खेळाडूंनी सहभाग नोंदविला त्यापैकी 22 खेळाडूंनी प्राविण्य मिळवत जिल्ह्याचे नाव
देशात गाजविले. गगनबावडा येथील परशुराम
विद्यामंदिर व ज्यूनिअर कॉलेजची विद्यार्थीनी दिव्या रामचंद्र संकपाळ हिने खेलो
इंडिया स्पर्धेअंतर्गत 100 मीटर धावण्यामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सन 2019 - 20 च्या शालेय क्रीडा स्पर्धेत
महाराष्ट्र राज्याने देशामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला या राष्ट्रीय स्पर्धेत
कोल्हापूर जिल्ह्यातील 236 खेळाडू सहभागी झाले यात 40 सुवर्ण, 19 रौप्य आणि 20 कास्य पदके मिळविली यासाठी
त्यांना 14 लाख 14 हजार 100 शिष्यवृत्ती शासनामार्फत देण्यात आली. कोरोना
काळामध्ये आर्थिक सहाय्य्य म्हणून दारिद्र्य रेषेखालील 7 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना व 8 दिव्यांग खेळाडूंना
प्रत्येकी 25 हजार अनुदान वाटप करण्यात
आले .
आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखण्याचा आनंद उपभोगत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती तुम्हा आम्हा सर्वांनाच नितांत आदर आहे. जिल्हयातील शहीद जवानांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या प्रती सर्वांनीच उतराई होणे अगत्याचे आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा कायम ठेवूया, असे
आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी
केले.
सेवाभावी संस्था, माध्यमांचे पालकमंत्र्यांकडून कौतुक कोरोना काळात प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, सामाजिक
संस्था, सेवाभावी संस्था, आशा, अंगणवाडी सेविका यांनी दिलेली सेवा आठवणीत राहणारी आहे. या काळात
पत्रकार, माध्यमांनी वस्तूस्थितीदर्शक
बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि उपाय योजनांची माहिती जनतेपर्यंत
पोहचविली आहे. या बद्दल पालकमंत्र्यांनी
सर्वांचे मनापासून आभार मानले आणि कौतुकही केले. |
पालकमंत्र्यांच्या
हस्ते गौरव समारंभ-
·
शहीद ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्या वारस वीरमाता
कविता जोंधळे आणि शहीद संग्राम शिवाजी
पाटील यांच्या वारस वीरपत्नी हेमलता पाटील यांना ताम्रपट वितरण करण्यात आले.
·
पोलीस अधीक्ष शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस निरीक्षक तानाजी
सावंत यांच्यासह 24 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव.
·
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता सैब्बनावर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
आर.आर. शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी राऊत
यांचा कोरोना काळात उत्ककृष्ट कामगिरीबद्दल गौरव
·
अग्निशामक विभागाकडील वाहनचालक अमोल पाटील, फायरमन
श्रीधर चाचे आणि गिरीष गवळी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव
·
महसूल जत्रेत उल्लेखनीय कामगिरीबाबत मंडल अधिकारी
भाऊसाहेब खोत व गणपती पाटील, तलाठी नसिम मुलाणी, साताप्पा पाटील, तानाजी जाधव,
शिवराज देसाई, तांत्रिक सहायक अशोक कोरे व सतीश दाबाडे यांचा गौरव
·
अमित शिंत्रे, शाहू माने, अभिज्ञा पाटील, रसिका
शिरगावे, ज्योती सुतार, हर्षवर्धन भोसले, अभिषेक जाधव, डॉ. वेदिका वालेकर,
दुर्वांक गावडे, दिव्या संकपाळ आणि प्राजक्ता सूर्यवंशी या खेळाडूंचा गौरव
·
हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची योजनेच्या
जिल्हास्तरीय विजेते भावेश्वरी महिला बचत
गट, बेलवळ, झाशीची राणी स्वयंसहायता समूह, आदमापूर, समृध्दी स्वयं सहायता समूह,
कुमरी, आयेश स्वयं सहायता समूह, चिंचवड,
वैभवलक्ष्मी महिला बचत गट, निवळी, सहाय्यगिरी महिला बचत गट, आंबा, उडान महिला बचत
गट, येळगुड, गगनगिरी महिला बचत गट, शेणवडे, नवसंजिवनी महिला बचत गट, हेर्ले,
सद्गुगुरु स्वयं सहायता समूह, बोरगाव यांचा गौरव.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.