इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

31 जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2416 केंद्राद्वारे 3 लाख 23 हजारावर बालकांना लसीकरण -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 


कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): येत्या 31 जानेवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून 0 ते 5 वयोगटातील 3 लाख 23 हजार 546 बालकांना 2 हजार 416  पोलिओ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून पोलिओची लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

देशामध्ये दिनांक  16 जानेवारी  पासून कोव्हिड लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दि. 17 जानेवारी   रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार पल्स पोलिओची मोहीम रविवार दि. 31 जानेवारी  रोजी राबविण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये कोव्हिड -19 विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून यावर्षी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, मास्क व ग्लोव्हज वापर करणे व सॅनिटायझर वापरणे या त्रिसूत्रीनुसार मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत एकुण 2 हजार 416 बुथची निर्मिती करण्यात आलेली असून त्याअंतर्गत एकूण  6 हजार 447 कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यासाठी एकूण 4 लाख 46  हजार 300 पोलिओ डोस प्राप्त झालेले आहेत.

जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3 लाख 23 हजार 546 बालकांना या दिवशी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. अगदी बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारहाट, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुध्दा ट्रान्झीट व मोबाईल  टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांचे मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आपणाकडे येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.