कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): बेळगाव
येथील दोन मराठी महिला संपादकांना अधिस्विकृती पत्रिका देण्यामध्ये पुढाकार घेवून
पाठपुरावा केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी सत्कार केला.
सीमा वासियांचा लढा सुमारे
64 वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये या भागातील मराठी वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. या
भागातील पत्रकारांनी विविध मागण्या केल्या होत्या. 7 जानेवारी 2019 रोजी बेळगाव
येथील बेळगाव जिल्हा मराठी वृत्तपत्र मालक संपादक संघ यांच्यावतीने मराठी पत्रकार
दिन साजरा करण्यात आला होता. या दिवशी जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते हे
प्रमुख उपस्थितीत राहून त्यांनी मार्गदर्शन केले होते.
पुढच्याच आठवड्यात दै.
वार्ताच्या संपादक क्रांती हुद्दार आणि दै. स्वतंत्र प्रगतीच्या संपादक बबिता
पोवार या दोन महिला संपादकांचे अधिस्विकृती पत्रिकेसाठी अर्ज भरून घेवून ते मंजूर
करून घेण्यासाठी पुढाकार घेवून पाठपुरावा केला होता. तसेच त्याचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील मराठी पत्रकारांना प्रथमच अधिस्विकृती
देवून महत्वाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर
यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना दिली. त्याबद्दल श्री. सातपुते यांचा
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुक करून
त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी महाराष्ट्र-कर्नाटक
सीमाप्रश्नी स्थापन समन्वय समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ तसेच मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, माहिती
व जनसंपर्क राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, माहिती संचालक अजय अंबेकर आणि गोविंद
अहंकारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.