इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी लाभार्थी संस्था/ वैयक्तिक लाभार्थी यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्यामार्फत दि. 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

गायरान जमिनीचा विकास करून त्यामधील गवताची गुणवत्ता व उत्पादकता वाढवून राज्यातील गाई-म्हशीतील उत्पादकता वाढविणे. वनक्षेत्र नसलेल्या नापिक/गायरान/गवती कुरणाचे क्षेत्र व पडीक जमिनीतून वैरण उत्पादन करणे. जमिनीची धूप थांबविणे व वैरणीचे उत्पादन करणे. उत्पादित वैरण पशुधन पोषणासाठी वापरून आहारातील वैरणीची तुट कमी करणे. वैयक्तिक शेतकऱ्याकडील वैरण उत्पादकता वाढविणे तसेच अतिरिक्त उत्पादित वैरण चारा संचयनीसाठी उपयोगात आणणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

या योजनेसाठी केंद्र हिस्सा 60 व राज्य हिस्सा 40 टक्के जमिनीच्या प्रकारानुसार प्रति हेक्टरसाठी अनुदान अनुज्ञेय आहे. गोचर/पडीक जमिनीला मशागतीची आवश्यकता आहे अशा सामाईक वरकस जमिनीसाठी 1 लाख रूपये.गोचर पडीक जमिनीला मशागतीची आवश्यकता नाही अशा सामाईक वरकस जमिनीसाठी 0.85 लाख रूपये. शासकीय जमीन, गोशाळा, पांजरपोळ यांच्याकडील जमीन 0.65 लाख रूपये. वनक्षेत्र राखीव व चाराऊ क्षेत्र यांच्याकडील जमीन 0.50 लाख रूपये व वैयक्तिक शेतकरी- (बहुवार्षिक चारा पिके घेण्याकरिता) पशुधनाचा सांभाळ करणाऱ्या संस्थेस 1 युनिटसाठी 205 हेक्टर व वैयक्तिक लाभार्थीस 1 युनिटसाठी 1 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या संस्थेस /लाभार्थीस राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.

लाभार्थी संस्था/वैयक्तिक लाभार्थीकडे नापिक/गायरान/गवती कुरण क्षेत्र पडिक स्वत:च्या मालकी हक्काची (7/12 चा उतारा) जमीन असावी. लाभार्थी संस्थेकडे कमीत-कमी 50 व वैयक्तिक शेतकऱ्याकडे 5 ते 10 पर्यंत पशुधन असावे. लाभार्थी संस्था गोशाळा, पांजरपोळ संस्था असेल तर त्यांची धर्मादाय विभागाकडे नोंदणी झालेली असावी. वैयक्तिक शेतकऱ्याने 3 वर्षापर्यंत वैरणीचे पीक घेण्याकरिता पशुसंवर्धन विभागाकडे करारनामा करून देणे बंधनकारक आहे.

संस्थांनी विहित नमुन्यामधील प्रस्ताव इंग्रजीत सादर करावेत. जमिनीचा 7/12 उतारा व 8-अ चा दाखला, संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव संचालक मंडळाची यादी, घटनेतील उद्देशाची प्रत, मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल व संस्थेकडे असलेल्या पशुधनाबाबतचे प.वि.अ. यांचे प्रमाणपत्र सादर करावे.

लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, जमिनीचा 7/12 चा उतारा व 8-अ चा दाखला व लाभार्थींकडे पशुान असल्याबाबतचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील प.वि.अ. यांचे प्रमाणपत्र सादर करावे.

अधिक माहितीसाठी अर्जाचा नमुना kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.