गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

प्रथम आम्ही लस घेणार न घाबरता सुरक्षिततेसाठी तुम्हीही घ्या खासगी वैद्यकीय संघटनांचे आवाहन

 




कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : ‘लसीकरणात प्रथम आम्ही लस घेवू न घाबरता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी तुम्हीही लस घ्या,’असे आवाहन खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी, डॉक्टर्स यांनी आज केले.

शनिवारी 16 जानेवारी रोजी जिल्ह्यात होणाऱ्या कोव्हिड लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खासगी वैद्यकीय संघटनांचे अध्यक्ष, डॉक्टर्स, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी लसीकरण मोहिमेच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, शनिवारी सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने लसीकरण यशस्वी करू. यानंतरचा दुसरा, तिसरा टप्पाही आपण सर्वांनी यशस्वी करण्यासाठी आपल्या स्तरावरून जनजागृती करावी. स्वत:च्या आणि कुटूंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, अत्यंत सुरक्षित व्हॅक्सीन आहे. याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबाबत सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, मास्क यासारख्या सुरक्षिततेचा अवलंब करण्यात येणार आहे.

डॉ. हर्षवर्धन जगताप, अध्यक्ष होमिओपॅथी संघटना- कोव्हिशिल्ड व्हॅक्सीन अतिशय सुरक्षित असून ते सर्वांनी घ्यावे. प्रतिकार शक्ती निर्माण होईल. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.

डॉ. पद्मराज पाटील, अध्यक्ष कोल्हापूर मानसोपचार तज्ञ संघटना- लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. या मोहिमेत आम्ही स्वत: प्रथम सहभागी होणार आहे. आम्ही लस घेतल्यानंतर निश्चितपणे आपणामधला आत्मविश्वास वाढेल. आपणही लस घ्यावी.

डॉ. शिरीष पाटील, अध्यक्ष जनरल प्रक्टीशनर असोसिएशन- 16 पासून लसीकरणाला सुरूवात होत आहे. या लसीकरणामुळे कोरोनाविरूध्द लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. प्रत्येकाने निर्भीडपणे ही लस घ्यावी.

डॉ. आबासाहेब शिर्के, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन कोल्हापूर- गेले वर्षभर कोरोनाशी झगडत शासन, आरोग्य विभाग आणि प्रशासनाने आटोक्यात आणले आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होत आहे. या लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. न घाबरता ही लस टोचून घ्यावी आणि कोरोनामुक्त वर्षाकडे वाटचाल करू.

डॉ. राजेंद्र वायचळ, सचिव निमा असोसिएशन- कोरोनाविरूध्द लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लस घ्यावी. ही लस अत्यंत सुरक्षित आहे.

डॉ. शीतल पाटील, सचिव जेडीएम कार्यकारी सदस्य केएमए- प्रथम फेरीत आम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य सेवक ही लस घेत आहोत. सर्वांनी ही लस घेवून कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा.

डॉ. गीता पिल्लाई, सचिव कोल्हापूर मेडीकल असोसिएशन- कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी होणाऱ्या लसीकरणाचा सर्वांनी फायदा घ्यावा.

बाबा जांभळे, अध्यक्ष रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर-  16 तारखेला लसीकरण मोहीम सुरू होत आहे. ही लस सुरक्षित आहे. सर्वांनी ती घ्यावी.

आजच्या बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, रोटरी क्लबचे सदस्य डॉ. आर.ए. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, जमाते उलेमाचे अरिफसाहेब  हवलदार, सिटी लायन्स आय हॉस्पिटलचे सचिव नरेंद्र पाध्ये, डॉ. अनिता सयबन्नावर, निमाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद मोकाशी आदी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.