सोमवार, १८ जानेवारी, २०२१

रस्ते अपघात कमी होण्यासाठी प्रबोधन करुया रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर करु - पालकमंत्री सतेज पाटील

 








 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : रस्ते अपघात कमी होण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रबोधन करु या. महिनाभर अभियान राबविण्यापेक्षा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर राबवू आणि आपली स्वयंशिस्त लावूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

सडक सुरक्षा जीवन रक्षा 32 व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते प्रबोधन फलक गॅलरीचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, रस्ता सुरक्षा सप्ताहावरुन पंधरवडा आणि आता महिनाभर अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी देशात साडेचार लाख अपघात झाले आहेत. त्यामध्ये दिडलाख मृत्यू झाले आहेत. म्हणजे दिवसाला 414 लोकांचा मृत्यू देशात होत आहेत. वाहन परवाना देतानाच कडक नियमांची अंमलबजावणी करा. त्याचबरोबर प्रबोधन, जनजागृती यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वत:लाच शिस्त लावून घ्यायला हवी.

मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास महिनाभरात सुरुवात

 राज्यातील केंद्रासाठी 136 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी मोरेवाडी येथील केंद्रासाठी 13 कोटी मंजूर झाले  आहेत. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, महिनाभरात मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या अपघातांबाबत विश्लेषणात्मक अहवाल तयार करावा. झालेल्या अपघातांची कारणे काय आहेत. सीट बेल्ट न वापरणारे किती अपघात, अपघातात विद्यार्थ्यांची संख्या किती याबाबत सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाने सादर करावा. हा अहवाल राज्याला सादर करु. यातून निश्चितच पुढील उपाययोजनांसाठी मदत होईल.

खासदार श्री. मंडलिक यावेळी म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळण्यासठी प्रबोधनात्मक प्रादेशिक परिवहन विभागाने परिसरातील भिंती बोलक्या केल्या आहेत. रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती केली आहे. याच पध्दतीने आपण सर्वांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशिल राहू या. महामार्गावर सुरक्षितपणे वाहतूक करता यावी, असे महामार्ग बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. वेगाचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या गाड्यांचे उत्पादन व्हावे. प्रादेशिक परिवहन विभाग हा महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे रस्त्यासाठीही अधिक निधी द्यायला हवा. वाहतुकीची शिस्त नागरिकांमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु आणि कोल्हापूर पॅटर्न राज्याला देवू असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, गाडी चालवाण्याची आपली पध्दत हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. रस्त्यावरील विशेषत: महामार्गवरील लेनचे नियम न पाळता ओहरटेक करतो. वाहनचालकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये संवेदनशिलता आणि शिस्त यायला हवी. त्याचबरोबर वाहन परवाना निलंबनासारख्या नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी.

पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे म्हणाले, स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन होणं यावर पोलीस दल भर देत आहे. गतवर्षी अपघाताचे 313 गुन्हे दाखल आहेत. यावर्षी हे प्रमाण कमी कसे करता येईल यावर पोलीस दर भर देत आहे. स्वयंशिस्त पालून सर्वांनी योगदान द्यावे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी यावेळी 32 व्या सुरक्षा अभियानाचे प्रयोजन सांगून सर्वांना प्रतिज्ञा दिली. अपघात मुक्त कोल्हापूरसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी रॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती माहिती पुस्तिका आणि स्टिकर्स प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक युनुस सय्यद यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.