बुधवार, १३ जानेवारी, २०२१

कोव्हिड व्हॅक्सीन लस जिल्ह्यात दाखल शनिवारी होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

 



कोव्हिड व्हॅक्सीन लस जिल्ह्यात दाखल

 शनिवारी होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण

          जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : शनिवार दि. 16 जानेवारी रोजी जिल्ह्यात सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37 हजार 580 व्हॅक्सीन आज जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

       कोव्हिड-19 लसीकरणाच्या नियोजन मोहिमेचा शुभारंभ शनिवारी होणार असून या अनुषंगाने मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोव्हिड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

          जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी याबाबत संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, या लसीकरण मोहिमेसाठी  सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा. त्यासंदर्भात त्या सर्वांची बैठक आयोजित करावी. त्यामध्ये धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर अशा एकूण 14 केंद्रांवर प्रत्येक केंद्रांवर 100 लाभार्थीप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.

           या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

000000

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.