गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

नगरपालिकांनी दिव्यांग कल्याणार्थ निधीचा खर्च शासन निर्णयानुसार करावा -निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे

 



 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिव्यांग कल्याणार्थ योजना हा महत्वाचा विषय आहे. 5 टक्के निधी खर्चासाठी शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिले.

दिव्यांग कल्याणार्थ योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. वैश्विक ओळखपत्रासाठी 18 हजार 456 जणांची नोंदणी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबत ग्रामीण रूग्णालय स्तरावर शिबीर घेवून निकालात काढावेत, असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी दिल्याचे ते म्हणाले. सर्व नगरपालिकांनी 5 टक्के निधी खर्चाबाबत जिल्हास्तरीय समितीकडून मंजुरी घ्यावी आणि त्यामधून दिव्यांगासाठी रॅम, स्वच्छतागृहे आदीबाबतची कामे करावीत. ही मंजुरी न घेतल्यास वित्तीय अनियमितता होण्याची शक्यता आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलंडे म्हणाले, याबाबत शासन निर्णयानुसार सर्वांनी अंमलबजावणी करावी. त्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. शासन निर्णय आणि त्याबाबतचे पत्र सर्व नगरपालिका, मुध्याधिकाऱ्यांना पाठवावेत. वैश्विक ओळखपत्र देण्याबाबत आरोग्य विभागाने सुरूवात करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिव्यांगांसाठी रॅम, स्वच्छतागृहे दुरूस्तीबाबत प्राधान्य द्यावे. सर्व शाळांमध्ये दिव्यांगांसाठी रॅम आहेत का असतील तर ते निकषानुसार आहेत का याबाबतचा सविस्तर अहवाल शिक्षण विभागाने द्यावा.

या बैठकीला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे, पन्हाळ्याचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे, सदस्य अतुल जोशी, दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्वाती गोखले, राज्य परिवहन मंडळाचे पर्यवेक्षक विजय भंडारे आदी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.