कोल्हापूर, दि. 22 (जिमाका)
: पुरामुळे बाधित झालेल्या व्यापार-व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यास राज्य शासन
कटिबध्द असून व्यापारी तसेच व्यावसायिकांना पूर हानीसाठी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत
देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडची बाजारपेठ पुन्हा
उभी करू, अशी ग्वाहीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंदगड
तालुक्यातील कोवाड येथील शेती, घरे आणि व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी, ग्रामस्थांशी आणि
व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी कोवाड येथे ते बोलत होते. त्यांच्यासमवेत माजी
राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, हेमंत
कोलेकर, प्रातांधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, सार्वजनिक बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बरूड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी
उपस्थिती होते. पालकमंत्र्यांनी आज चंदगड तालुक्यातील कोवाड, दुंडगे, राजगोळी, निटटूर
आदी गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला.
यंदा
शासनाने प्रथमच पूरबाधित छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असून महापूराच्या
पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापारी-व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान
झाले असून या संकटसमयी व्यापाऱ्यांना मदत करून त्यांच्या व्यवसायाची पुन्हा घडी
बसवली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरहानी झालेल्या
व्यापाऱ्यांना उभारी देण्यासाठी शासनामार्फत 50 हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात
येणार आहे. व्यापार-व्यावसायिकांच्या पूरहानीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे
करण्याचे निर्देश महसूल प्रशासनास दिले आहेत. चंदगड तालुक्यातील कोवाडची बाजारपेठ
एक प्रसिध्द बाजारपेठ असून ही बाजारपेठ पुन्हा उभी करण्यासाठी शासनाबरोबरच विविध
सेवाभावी संस्था, पक्ष यांच्या सहभागातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील, अशी
ग्वाही त्यांनी दिली.
पूरग्रस्तांना
पुन्हा उभं करण्यासाठी शासन कटिबध्द असून पूरग्रस्तांच्या मदत कार्याला पैसा कमी
पडणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री
श्री. पाटील म्हणाले, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे 1 हेक्टरच्या
मर्यादेत पीक कर्ज व्याजासह माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतीच्या
नुकसानीचे युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले असून पात्र
पूरबाधित एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन केले
असल्याचेही ते म्हणाले. पूरहानीमुळे गुऱ्हाळघरांच्या झालेल्या नुकसानीबाबतही मदत
करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.
पुरामुळे पडलेल्या घरांच्या उभारणीचा व्यापक
कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,
पूरामुळे घर पडलेल्या कुटुंबाला घर उभारणीसाठी अडीच लाख रुपये उपलब्ध करुन दिले जाणार
असून ज्यांचे पूरामुळे घर पडले आहे
त्यांना नवीन घर एका वर्षाच्या कालावधील
उपलब्ध होईल या पध्दतीने प्रशासनाचे नियेाजन केले आहे. तोपर्यंत त्यांना इतरत्र
भाड्याने राहण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार
रुपये एकरकमी उपलब्ध करुन दिले जातील, अशी
ग्वाहीही त्यांनी दिली.
पूरग्रस्तांना
रोख स्वरुपात 5 हजार रुपये रोख देण्यात आले असून उर्वरित 5 हजार रूपये त्यांच्या बँक
खात्यात जमा केले जातील, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री म्हणाले, पूरग्रस्तांना प्रती
कुटुंब दरमहा 20 किलो धान्य पुढील 4
महिन्यासाठी मोफत देण्यात येत आहे. पाण्याखाली गेलेल्या शेतीसाठी 1 हेक्टरच्या
मर्यादेत पीक कर्ज व्याजासह माफ केले जाईल तर ज्यांनी कर्ज घेतले नाही अशा
शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या तिप्पट मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी
जे-जे करावे लागेल ते निश्चितपणे केले जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुरामुळे पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच बुडालेल्या
शेतीसाठीही पीक कर्ज माफ, वाहून गेलेल्या जनावरांसाठी मदत, गोठा उभारणीसाठी मदत
तसेच विद्यार्थांना मोफत पुस्तके देणे,
मुलींना एसटी प्रवास मेाफत अशा सर्व बाबींवर शासनाने लक्ष केद्रींत केले आहे. कोवाड
आणि दुंडगे या ठिकाणी पुल उभारण्याच्या लोकांनी केलेल्या मागणीबाबत
पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ अंदाजपत्रक तयार
करण्याचे निर्देश दिले. पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या तसेच पूलांच्या
उभारणीच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चंदगड तालुक्यातील
कोवाडबरोबरच दुंडगे, राजगोळी, निटटूर आदी गावांना भेटी देऊन पूरपरिस्थितीची पाहणी
केली. पूरग्रस्त शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या झालेल्या
नुकसानीची पाहणी केली. पुरग्रस्तांनी महापुराच्या संकटाचा संयमाने केलेला मुकाबला
महत्वाचा असून पुरग्रस्ताच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही दिली.
महापूराच्या संकटामुळे पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये. शासन तुम्हाल जे-जे लागेल ती
मदत करण्यास तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोवाड, दुंडगे आणि निटटूर
या गावात पुरग्रस्तांना सानुग्रह अनुदानापोटी 5 हजार रुपये तसेच बचाव व मदतकार्य
युध्दपातळीवर केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.