कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : पूरग्रस्तांना पुन्हा
उभं करण्यास शासन कटिबध्द असून पूरग्रस्तांच्या
मदत कार्यासाठी जेवढा लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा महसूल
तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाड, बस्तवाड येथील पूरामुळे झालेल्या
नुकसानीची पाहणी करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केली,
त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत गोकुळचे संचालक बाबा देसाई, अशोकराव माने,
तहसिलदार गजानन गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने,
कार्यकारी अभियंता श्री. सोनवणे, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी
उपस्थिती होते.
पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी पैसा
कमी पडणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या व्यवसायींकाचे व
व्यापाऱ्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे, त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत
तातडीने उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी तात्काळ पंचनामे केले जातील. याशिवाय पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पीक कर्ज
माफ केले जाईल. पुरामुळे घर पडले असेल तर नवीन घर उभे राहीपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार
रुपये उपलब्ध करुन दिले जातील. ग्रामीण भागातील पडलेल्या घरांच्या उभारणीसाठी अडीच
लाख रुपये उपलब्ध करुन दिले जातील.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,
पूरग्रस्तांनी वारंवार पूराचे पाणी येत असल्यामुळे शासकीय अथवा खासगी जागा शोधून
त्याठिकाणी घरांची उभारणी करणे गरजेचे असून याबाबतचा निर्णय गावकऱ्यांनी घ्यावा.
त्यांना घर उभारणीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. शासकीय जागा उपलब्ध
नसल्यास प्रसंगी खासगी जागा शासन खरेदी करेल, मात्र या कामी गावकऱ्यांनी सक्रीय
होणे गरजेचे आहे.
कुरुंदवाड येथील कुंभार समाजाचे मोठे
नुकसान झाले असून या मुर्तीकारांना मुंबईहून 2 हजार गणेशमुर्ती आणून दिल्या जातील.
तसेच कुरुंदवाड येथील व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन
त्यांनाही शासनातर्फे आवश्यक ती मदत उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्हणाले.
नृसिंहवाडी येथील व्यापाऱ्यांच्या
झालेल्या नुकसानेचेही तात्काळ पंचनामे करुन शासनातर्फे देण्यात येणाऱ्या 50
हजाराची आर्थिक मदत प्राधान्याने उपलब्ध करुन दिली जाईल. याबरोबरच समाजातील विविध
सेवाभावी, स्वयंसेवी संस्थाची मदत घेऊन पूरग्रस्तांना सहाय्य केले जाईल. नृसिंहवाडी
येथील दत्त मंदिरासमोरील पडलेला मंडप तात्काळ पुन्हा उभा केला जाईल, अशी ग्वाहीही
पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.
यंदाचा महापूर अतिशय गंभीर असून 2005
च्या पूराच्या तुलनेत तिप्पट पाऊस झाल्याने महापूराची व्याप्ती वाढली. मात्र शासन,
प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने 4 लाख 13 हजार पूरग्रस्तांना
सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. त्याबरोबरच त्यांची संक्रमण शिबीरामध्ये
जीवनावश्यक वस्तूंसह सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था
केली. त्यानंतर पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रोख
स्वरुपात देण्यात आले असून उर्वरित 5 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले
जातील, सध्या पूरग्रस्त भागामध्ये शासन यंत्रणा व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून
स्वच्छतेची मोहीम सुरु केली असून यामध्येही नागरिकांनी सक्रीय योगदान दिल्याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केले.
या पूर परिस्थितीत जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी
धैर्य आणि संयमाने या पूरपरिस्थितीवर मात केली याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक
केले. पूरग्रस्तांसाठी मदत कार्य युध्द पातळीवर हाती घेतल्याबद्दल नागरिकांनी
समाधान व्यक्त केले.
पूरग्रस्त गावे पुन्हा उभी करण्यासाठी
शासन सक्रीय आहे. याबरोबरच अन्य स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून अनेक
गावांना पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील. याकामी शासन पुढाकार घेईल,
अशी ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली. सांगली, कोल्हापूर मध्ये
उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी चार जणांची तज्ञ समिती शासनाने नेमली असल्याचेही ते
म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
नृसिंहवाडी येथील व्यापारी व दुकानदारांची भेट घेऊन व्यवसायाच्या झालेल्या नुकसानीची
माहिती घेतली. पुरामुळे दत्तमंदिर परिसरातील मंडप व अन्य नुकसानीचीही त्यांनी
पाहणी केली. कुरुंदवाड परिसरात झालेल्या
शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी केली. कुंभार समाजाच्या झालेल्या गणेश मूर्तीच्या
नुकसानीची पाहणी केली. कुंरुदवाड येथे व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी
करुन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. बस्तवाड येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना
दिलासा दिला. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी
दिली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.