शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

पोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प राज्यात अव्वल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील सोहळ्यात पुरस्कार वितरण



पोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प राज्यात अव्वल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील सोहळ्यात पुरस्कार वितरण
            कोल्हापूर,दि. 23: पोषण अभियानांतर्गत कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम सातत्यपूर्ण राबविल्याबद्दल आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. याबद्दल केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज शुक्रवारी नवी दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे एका शानदार कार्यक्रमात बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांना पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री देबाषी चौधरी, केंद्रीय सचिव राजेंद्र पवार, अतिरिक्त सचिव अजय टीकरे आदी उपस्थित होते.
            महिला बाल विकास विभागाच्या करवीर 2 प्रकल्पाने पोषण अभियानांतर्गत प्रकल्प कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष पोषण उपक्रम राबविला. याकरिता तीव्र कुपोषित श्रेणी मध्ये तातडीने येणाऱ्या मध्यम कुपोषित बालकांसाठी कोणतीही विशेष शासकीय योजना नाही हे ओळखून प्रकल्प कुपोषण मुक्त करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये 105 मध्यम कुपोषित (मॅम) बालकांसाठी सलग दोन महिने प्रतीदिन 5 ग्रॅम आयुर्वेदीक च्यवनप्राश पालकांच्या संमतीने दिले. तत्पूर्वी च्यवनप्राशमधील घटक, फायदे, वापरण्याची योग्य पध्दती, नोंदी ठेवणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. यानंतर 52 बालके साधारण श्रेणीत आली, 101 बालकांचे वजन वाढले. त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारी कमी झाल्या रोग प्रतिकारक शक्ती वाढली. 
            कुपोषित मुलांच्या पोषण श्रेणी सुधारण्यासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण पोषण उपक्रमासाठी 2018-19 सालाकरिता या पुरस्काराने आयसीडीएस करवीर 2 या एकमेव प्रकल्पाची महाराष्ट्रातून राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राज्यातून गेलेल्या या प्रकल्पाला नवी दिल्लीत मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.