कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : महापुरामुळे
व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून व्यावसायिकांना नुकसानीच्या 75
टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख
यांनी दिली.
नगरपालिका कार्यालय, इचलकरंजी येथे
सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त
भागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष अलका
स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी
दिपक पाटील, व अतिरिक्त् मुख्याधिकारी पवन म्हेत्रे उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री म्हणाले, शासकीय
योजनापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी, पंचनामे करताना अटी शर्ती
न पाहता मदत करावी. व्यापारी, हातमाग, सलुन व्यावसायिक कुंभार यांना नुकसानीच्या
75 टक्के मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे
त्यांना शासनामार्फत भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी त्या-त्या भागात एक समिती स्थापन केली आहे.
पूरग्रस्त भागतील एक हेक्टरपेक्षा कमी कर्ज असणाऱ्या पूर बाधित शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून ज्यांनी कर्ज काढले नाही त्यांना तीनपट मदत
मिळणार आहे. तसेच तात्पुरत्या घर बांधणीसाठी
ग्रामीण भागात दर महिन्याला दोन हजार रुपये मदत व शहरी भागास प्रती महिना तीन हजार
रुपये मदत देणार असून ही मदत सहा महिन्यासाठी असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.
देशमुख म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले, पूर बाधित
गावांना पुन्हा उभे करण्यासाठी शासनाने सामाजिक
क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना आवाहन केले असून काही संस्थामार्फत गावे दत्तक घेतली जात आहेत. पूर बाधित गावे
दत्तक घेण्यासाठी आणखी संस्थानी पुढाकार
घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजने मध्ये सर्वांना घर
देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बाधीत कुटुंबाना ग्रामीण भागाला दहा हजार व
शहरी भागाला पंधरा हजार मदत देण्यात येणार आहे. रेशन कार्ड एक परंतु कुटुंब विभक्त
आहेत त्यांना स्वतंत्र मदत देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री देशमुख
म्हणाले.
श्री. देशमुख यांनी चंदूर गावास भेट
देऊन पाहणी केली. राज्य शासनाने गावे दत्तक घेण्याच्या केलेल्या आवाहनानुसार चंदूर
हे गाव सोलापूर सोशल फाऊंडेशनने दत्तक घेतले असून पूर बाधितांच्या पाठीमागे सरकार
भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री श्री देशमुख यांनी दिली.
गावातील तलाठी/सर्कल यांनी अटी व शर्ती न पाहता सर्वाना मदत करा अशा सूचना त्यांनी
दिल्या. यावेळी बापुशेट मर्दा, संचालक दत्त शुगर्स रघुनाथ पाटील, सरपंच माणिक
पाटील व श्री आबा घायतिडक उपस्थिती होते.
इचलकरंजी येथील आयोजित बैठकीत शामलाल
मर्दा फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांसाठी 51 लाखाची मदत मंत्री महोदयांकडे सुपूर्द
करण्यात आली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.