शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

स्वच्छता,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी पूरग्रस्त 310 गावांना 2 कोटी 89 लाखाचा निधी ‍- जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक




कोल्हापूर दि.16 (जिमाका)  : जिल्ह्यातील 310 पूरग्रस्त गावातील वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी  शासनाकडून 2 कोटी 89 लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दिली.
            पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील  ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या परिस्थितीत गावामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छतेचे महत्व लक्ष्यात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कच-याचे वर्गीकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी  शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे .या ग्रामपंचायतींना सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना रु 50,000/- आणि  1000 पेक्ष्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये 1,00,000/- विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घोषित केलेल्या 310 पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामासाठी दिला जाणार आहे. 
            या निधीतंर्गत ग्रांमपंचायत स्तरावर खालील प्रमाणे स्वच्छेतेची कामे घेण्यात येणार आहेत. 
 गाव स्तरावरील स्वच्छेतेसाठी  लागणारे अतिरिक्त रोजंदारीवर मनुष्यबळ उपलब्ध करणे.  सार्वजनिक स्वच्छेतेसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. (धुरळणी , धूर फवारणी, निर्जंतुकीकरण साधनांद्वारे स्वच्छता करणे. इत्यादी ) घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे. आवश्यक साधने भाड्याने घेणे.  स्वच्छतेसाठी आवश्यक कामे करणे. 
            जिल्हयतील या ग्रामपंचायतींनी स्वच्छता कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही व आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची सर्व ग्रामपंचायतींनी दक्षता घ्यावी, पूरग्रस्त अशा 310 गांवामध्ये  करवीर तालुक्यातील 55 गावे, कागल तालुक्यातील 33 गावे, पन्हाळा तालुक्यातील 44 गावे, शाहूवाडी तालुक्यातील 23 गावे, हातकणंगले तालुक्यातील 21 गावे, शिरोळ तालुक्यातील 40 गावे, राधानगरी तालुक्यातील 21 गावे, भुदरगड तालुक्यातील 19 गावे, गगनबावडा तालुक्यातील 2 गावे, गडहिंग्लज तालुक्यातील 14 गावे, आजरा तालुक्यातील 23 गावे व चंदगड तालुक्यातील 15 गावांचा यामध्ये समावेश आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.