बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

आंबेवाडीतील पूरग्रस्तांना सोनतळी येथे देण्यात आलेले प्लॉट संबंधितांच्या नावावर करुन घरबांधणीसाठी अडीच लाख देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



            कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) :, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांना 1989 च्या पुरामध्ये सोनतळी येथे देण्यात आलेले प्लॉट संबंधितांच्या नावावर करुन दिले जातील, तसेच घरबांधणीसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
       करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार चंद्रदिप नरके, प्रांताधिकारी सचिन इथापे, ततहसिलदार सचिन गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. भोसले, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सरपंच सिकंदर मुजावर, उपसरपंच श्री. सुतार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थिती होते.
            आंबेवाडीला वारंवार पुराचा धोका उदभवत असून त्यांना सोनतळी येथे घरे बांधून देणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, घरांच्या उभारणीसाठी पैसा कमी पडणार नाही, मात्र सोनतळी येथे घरांची उभारणी केल्यानंतर त्यांनी पावसाळयाचे 4 महिने आपल्या गुरासह तेथे स्थलांतरीत होणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास उपस्थित ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येवून चर्चा करुन सर्वानुमते सोनतळी येथे घरांच्या उभारणीबाबत निर्णय घ्यावा.  तहसिलदारांनी यासाठी घरांसाठीचा आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
            शासनाच्या मदतीपासून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुरामुळे घर पडले असेल तर नवीन घर उभे राहीपर्यंत एक वर्षाच्या  कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार रुपये पूरग्रस्तांना उपलब्ध करुन दिले जातील. तर ग्रामीण भागातील पडलेल्या घरांच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे एक हेक्टरपर्यंतचे पीक कर्ज व्याजासह माफ केले जाईल.
            छोट्या व्यापाऱ्यांच्या पुरामुळे झालेल्या नुकसानेचेही तात्काळ पंचनामे करुन शासनातर्फे त्यांना 50 हजाराची आर्थिक मदत प्राधान्याने उपलब्ध करुन दिली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  यंदाचा महापूर अतिशय गंभीर असून 2005 च्या पूराच्या तुलनेत तिप्पट पाऊस झाल्याने महापूराची व्याप्ती वाढली. मात्र शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने 4 लाख 13 हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. त्याबरोबरच त्यांची संक्रमण शिबीरामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली. त्यानंतर पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रोख स्वरुपात देण्यात आले असून उर्वरित 5 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. तसेच पूरग्रस्त कुटुंबाला 20 किलो धान्य चार महिने मोफत दिले जाईल. सध्या पूरग्रस्त भागामध्ये शासन यंत्रणा व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेची मोहीम सुरु केली असून यामध्येही नागरिकांनी सक्रीय योगदान दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
            यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंबेवाडी येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व पूरग्रस्तांना दिलासा दिला.  यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्य अडी-अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.