कोल्हापूर,
दि. 12 (जिमाका) : पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याने आज सातारा-कागल राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक 4 वर वाहतूक सुरु करण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये 2 लाख 70 हजार
लिटर पेट्रोल, 2 लाख 40 हजार लिटर डिझेल तर 14 हजार सिलेंडर शहरामध्ये दाखल झाले. शिरोळ
तालुक्यामधील पूरग्रस्तगावांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे आज अखेर 24 टन अन्न व
जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी दिली.
गेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद असणारा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती.
दुपारनंतर दुसऱ्या बाजूवरही वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र एकाबाजूने केवळ जड
वाहने सोडण्यात येत आहेत. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर,
पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले.
त्यामुळे आता पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
शिरोळ,
हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती
ठिकाणच्या परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 13 ते 16 अखेर
सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
एसटी वाहतूक सुरु
महामार्ग
खुला झाल्याने परिवर्तन, शिवनेरी या राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यातील गाड्याही
शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधून पुणे, मुंबई, बेळगाव एसटी वाहतूक आज
सुरु झाली. कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी हे दोन
मार्ग अद्यापही बंद आहेत. अंबोलीपर्यंत वाहतूक सुरु आहे परंतु पुढे बंद आहे. तसेच
जयसिंगपूरपर्यंत वाहतूक सुरु असून पुढे बंद आहे.
जीवनावश्यक
वस्तुंचा पुरवठा शहरामध्ये होत आहे. त्याचबरोबरच पुरामुळे निर्माण झालेला कचरा
निर्मुलन, विघटन करणे, मृत जनावरांच्या
शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. उद्यापासून शिबीरातील पूरग्रस्तांना प्रती
व्यक्ती प्रतीदिन 60 रुपये व लहान मुलांना 45 रुपये अशी एक आठवड्याची रोख रक्कम
देण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून ग्रामीण भागातील पूरगस्तांना 10 हजार
रुपये, शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपये देय आहे यापैकी 5 हजार रुपये रोख
स्वरुपात वाटण्याची कार्यवाही उद्यापासून सुरु होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी
ओसरले आहे त्या गावचे पंचनामे करण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात येत आहे.
मदत स्वीकारण्यासाठी
शिरोली आणि अंबप फाटा येथे मदत केंद्र
जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. ही मदत
स्वीकारण्यासाठी शिरोली एमआयडीसी प्लॉट क्रमांक 1 येथे स्वीकारण्यात येत आहे.
येथील संपर्क क्रमांक 9075748361. दुसरे मदत केंद्र अंबप फाटा 8856801708 या
क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी संपर्क करावा. ही मदत
प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येईल, असे आवाहनही
जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
|
नैसर्गिक
आपत्तीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व विमा कंपन्यांनी
सर्वच कागदपत्रांचा पाठपुरावा न करता विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए
)च्या निर्देशानुसार 15 दिवसात आपले दावे
निर्गत करावेत, याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रही
सर्व विमा कंपन्यांना आज देण्यात आले आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये आज
अखेर सुमारे 24 टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप हेलिकॉप्टरच्या माध्यमातून
करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील पाणी पातळीमध्ये घट होत आहे. लवकरच येथेही
जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.