रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचा वस्तुनिष्ठ अहवाल द्या -जिल्हाधिकारी दौलत देसाई




       कोल्हापूर दि. 18 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तेचा तालुकानिहाय वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
       जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिलहाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, शासकीय इमारती, रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा प्रकल्प, विजेचे खांब, वायरींग, जनित्र, रोहित्र, बगीचे, ड्रेनेज, एस.टी. वाहने आदी मालमत्तेचे अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे झालेले नुकसान अशी वर्गवारी करावी. याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपासणी करुन अहवाल सादर करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने यांची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालमत्तेचे पूर्ण नुकसान तसेच अंशत: नुकसान या मालमत्तेची दुरुस्तीसाठी येणारा खर्च तसेच कायमस्वरुपी पुनर्उभारणीसाठी येणारा खर्च या सर्वांचा समावेश करुन तालुकानिहाय अहवाल सादर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.