गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

महापूरामुळे पडलेल्या घरांसाठी अडीच लाखाची मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज व्याजासह माफ करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हेब्बाळ, हिटणी, नांगनुर येथील पूरग्रस्तांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद





कोल्हापूर,दि. 22 (जि.मा.का.): महापूरामुळे घर पडलेल्या कुटुंबियांना घर उभारणीसाठी शासनामार्फत अडीच लाखाची मदत केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केली.
            गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हेब्बाळ, हिटणी, नांगनुर येथील पूरपरिस्थितीच्या नुकसानीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी हेब्बाळ येथे ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, उद्योजक रमेश रेडेकर, रामराजे कुपेकर,  जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, सचिन बल्लाळ, अनिता चौगुले, प्रातांधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार रामलिंग चव्हाण, गटविकास अधिकारी सीमा जगताप,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बरूड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
            पूरग्रस्त कुटुंबाच्या पडलेल्या घराची उभारणी करण्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, मात्र घर उभारायचे आहे त्या ठिकाणी अथवा अन्य ठिकाणी करण्याबाबतचा निर्णय गावकऱ्यांनी एकत्र बसून घेणे गरजेचे आहे. यासाठी शासकीय अथवा खासगी जागा शोधून त्याठिकाणी घरांची उभारणी करावी, घर उभारणीसाठी शासन, स्वयंसेवी सेवाभावी संस्था तसेच लोकसहभागातून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास प्रसंगी खासगी जागा शासन खरेदी करण्याबाबतही शासन पुढाकार घेईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पूरग्रस्तांच्या घरासाठी अडीच लाखाची मदत करण्यात येणार असून नवीन घर बांधेपर्यंत त्यांना इतरत्र भाड्याने राहण्यासाठी  एक वर्षाच्या  कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार रुपये एकरकमी  उपलब्ध करुन दिले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.        
            2005 च्या पूराच्या तुलनेत यंदाचा महापूर अतिशय गंभीर असून या महापूरातही पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या कामास प्रशासनाने स्व्यंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने केलेले प्रयत्न मोलाचे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यावर्षी 2005 च्या तुलनेत तिप्पट पाऊस झाल्याने महापूराची व्याप्ती वाढली. मात्र शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने जिल्हृयातील 4 लाख 13 हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. त्याबरोबरच त्यांची संक्रमण शिबीरामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली. या महापूरात जिल्ह्यातील जनतेने धैर्य आणि संयमाने या पूरपरिस्थितीवर मात केली याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. पूरग्रस्तांसाठी मदत कार्य युध्द पातळीवर हाती घेतल्याबद्दल गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. सध्या पूरग्रस्त भागामध्ये शासन यंत्रणा व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेची मोहीम सुरु केली असून यामध्येही नागरिकांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
            पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे 1 हेक्टरच्या मर्यादेत पीक कर्ज व्याजासह माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले असून पात्र पूरबाधित एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यातील पुरग्रस्तांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची तसेच पडलेल्या घरांची पाहणी, छोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पुरग्रस्तांना सर्वती मदत करून त्यांचे जीवन पुन्हा उभं करण्याचा निर्धार शासनाचा असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.