कोल्हापूर दि. 14 : (जिमाका) जिल्ह्यातील महापूर आता हळू-हळू
ओसरु लागला असून पूरग्रस्त भागात आरोग्य आणि स्वच्छतेचे काम युध्द पातळीवर हाती घेतले
आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
आरोग्य
विभागाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी येथील सेवा रुग्णालयात आयोजित केलेल्या
आरोग्य शिबीरात सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्य
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदिप नरके,
संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. बी.सी. केंम्पीपाटील, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कदम
यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकार व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यावर यंदा महापुराचं मोठं संकट
आलं. या महापुराचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबध्द आहे, असे स्पष्ट
करुन आरोग्य मंत्री श्री. शिंदे म्हणाले,
पुराच्या पहिल्या दिवसापासून राज्याचा आरोग्य विभाग कार्यरत ठेवला आहे. आरोग्य
विभागातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना पूर परिस्थितीत पुरग्रस्तांना आरोग्य सेवा
तात्काळ पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुरग्रस्तांच्या स्थलांतरीत
ठिकाणी आरोग्य विभागाची वैद्यकीय पथके तैनात केली. आता पूर ओसरु लागला आहे.
त्यामुळे पूरग्रस्त भागात साथीचा तसेच अन्य जलजन्य व कीटकजन्य आजारांचा उद्रेक
होणार नाही, यासाठीही आरोग्य यंत्रणा कटिबध्द आहे.
पुरग्रस्त भागात दलदल, चिखल, कचरा
आदीमुळे दुर्गधी आणि आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने पुरग्रस्त भागात आरोग्य
यंत्रणा, स्वयंसेवी , सेवाभावी संस्थांबरोबरच सक्रीय असून आवश्यक असणारी डॉक्टर्स,
वैद्यकीय कर्मचारी- स्टाफ उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पुरग्रस्तांनसाठी औषधे,
पुरेशी लसीची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. पुरग्रस्तांची आरोग्य आणि स्वच्छतेची
काळजी घेण्यास आरोग्य विभाग सज्ज असून साथीच्या आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजना
राबविण्याबरोबरच आरोग्य शिक्षणावरही आणि सर्वेक्षणावर अधिक भर दिला असल्याचेही
आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील
पुरपरिसिथतीच्या सुरवातीपासून आपण व्यक्तिश: लक्ष केंद्रीत केले असून
पुरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली. संक्रमण
शिबीरातील तसेच स्थलांतरीत पुरग्रस्तांची भेट घेवून त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध
करुन दिल्या आहेत. संक्रण शिबीरामध्ये तसेच गावागावांत वैद्यकीय पथके
सुरुवातीपासून तैनात केली असल्याचे सांगून आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
कोल्हापूरातील पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे येथूनही विशेष वैद्यकीय पथके
कार्यरत ठेवली. तसेच मोठ्या प्रमाणावर औषधांचा पुरवठा केला. याकामी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात राहून
त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुरग्रस्तांसाठी आरोग्य यंत्रणा तैनात केली.
पुरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध
करुन देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग कटिबध्द असल्याचे सांगून आरोग्य मंत्री
एकनाथ शिंदे म्हणाले, पुरग्रस्तांसाठी आरोग्य आणि स्वच्छतेमध्ये शासन कसूभरही शासन
कमी पडणार नाही. आरोग्य विभागाच्या सचिव ते संचालकापासून सर्व यंत्रणा
पुरग्रस्तांसाठी सक्रीय केली आहे. कोणत्याही परिस्थिती साथीच्या आजारामुळे एकही
रुग्ण दगावणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे. जनतेनेही साथीच्या
आजाराबाबत दक्षता घेवून आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.