कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : चिखली येथील
पूरग्रस्तांना सोनतळी येथे देण्यात आलेल्या प्लॉटवर घरे बांधून देण्याबरोबरच पूरबाधित
35 गुऱ्हाळ घरांच्या नुकसानीबाबत येत्या मंत्रीमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला
जाईल, अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना
दिली.
करवीर तालुक्यातील चिखली येथील पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार
चंद्रदिप नरके, प्रांताधिकारी सचिन इथापे, ततहसिलदार सचिन गिरी, सार्वजनिक बांधकाम
विभागाचे उप अभियंता श्री. भोसले, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब
यादव, रघुनाथ पाटील, एस.आर.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी
उपस्थित होते.
चिखली येथे 35 गुऱ्हाळ घरे असून
त्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत शासनस्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे एक हेक्टरपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा
शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये सरळ कर्ज आणि खावटी कर्जही माफ करण्याची
शेतकऱ्यांची मागणी येत्या मंत्रीमंडळ बैठकीत मांडली जाईल आणि या संदर्भातील निर्णय
घेतला जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
चिखली
गावाला वारंवार पुराचा धोका उदभवत असून त्यांना 1989 च्या पुराप्रसंगी सोनतळी येथे
प्लॉट देण्यात आले आहेत. हे सर्व प्लॉट संबंधितांच्या नावावर करुन देण्याबरोबरच
त्यांना घरबांधणीसाठी अडीच लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे सांगून पालकमंत्री
चंद्रकांत पाटील म्हणाले की, घरांच्या उभारणीसाठी पैसा कमी पडणार नाही, मात्र
सोनतळी येथे घरांची उभारणी केल्यानंतर गावकऱ्यांनी पावसाळयाचे 4 महिने आपल्या
गुरासह तेथे स्थलांतरीत होणे आवश्यक आहे. याबाबत गावकऱ्यांनी एकत्र येवून चर्चा
करुन सर्वानुमते सोनतळी येथे घरांच्या उभारणीबाबत निर्णय घ्यावा. याकामी आमदार चंद्रदिप नरके यांनी पुढाकार
घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शासनाच्या मदतीपासून एकही पूरग्रस्त
वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुरामुळे
घर पडले असेल तर नवीन घर उभे राहीपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठीचे दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार
रुपये पूरग्रस्तांना उपलब्ध करुन दिले जातील. तर ग्रामीण भागातील पडलेल्या
घरांच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यंदाचा महापूर अतिशय गंभीर असून प्रशासन आणि
स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने 4 लाख 13 हजार पूरग्रस्तांना सुरक्षित
स्थळी स्थलांतरीत केले. चिखली येथील गावकऱ्यांनी लष्कराच्या जवानानी सुरक्षित
ठिकाणी हलवून लोकांचे जीव वाचवले.
पूरग्रस्तांना
शासकीय कागदपत्रे महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येत असून गॅस
वाहून गेला असेल तर त्यांना नवीन कनेक्शन देण्याबरोबरच 10 हजार शेगड्या
लोकसभागातून उपलब्ध करुन दिल्या जातील. सध्या 300 जणांची टीम शेगडी दुरुस्तीसाठी
कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी
बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, चिखली गावाला पुराच्या गंभीर प्रसंगातून
वाचविण्याचे काम राज्य शासनान केले आहे. शासनाने पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य
लष्करी व अन्य जनावांच्या तसेच स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या मदतीने यशस्वीपणे
केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी एस.आर.पाटील यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी चिखली येथील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी
पूरग्रस्तांच्य अडी-अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यास प्राधान्य दिले
जाईल, अशी ग्वाही दिली.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.