प्रती माणसी प्रती दिन 60 रुपये गावात जावून
पूरग्रस्तांना दया
शिबिरांमध्ये वस्तू पुरविणाऱ्या एनजिओनाही शासकीय
दराने पैसे
-पालकमंत्री
चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर, दि. 10
(जि.मा.का.) : गावात राहिलेल्या पूरग्रस्तांना प्रती दिन प्रती माणसी 60 रुपये, तर
लहान मुलांना 45 रुपये गावात जावून दया. शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक
वस्तू पुरविणाऱ्या एनजिओना शासकीय दराने प्रतीपूर्ती
करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज
दिली.
जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री श्री. पाटील
यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी
अमल मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे
आदी उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. पाटील यांनी इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, हातकणंगलेचे तहसिलदार
सुधाकर भोसले यांना फोन करुन शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पूरपरिस्थितीबाबत
माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
यांच्याकडूनही दूरध्वनीद्वारे पूरपरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूरग्रस्तांसाठी छावणीमध्ये जीवनावश्यक वस्तू
पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना शासन शासकीय दराने पैसे देणार आहे. उद्यापासून अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावात जाऊन
घरांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना प्रतिदिन प्रती माणसी साठ रुपये तसेच लहाना मुलांना
पंचेचाळीस रुपये द्यावेत त्याबाबत योग्य नियोजन करावे. पूरग्रस्तांसाठी पुणे येथून
भाजीपाल्याचे ट्रक मागविण्यात येणार आहेत. शहरामध्ये कमी दराने विक्री केंद्रे
सुरु करण्यात येणार आहेत.
शिरोळमध्ये हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वितरण
-
जिल्हाधिकारी दौलत देसाई
वायू
दलाच्या हेलिकॉप्टरमधून शिरोळ तालुक्यातील टाकळी, बुबनाळ, कुरुंदवाड, बस्तवाड या
गावांमध्ये 5 हजारांहून अधिक अन्नाची पाकिटे पूरग्रस्तांसाठी आज पाठविण्यात आली.
त्याचबरोबर विशाखापट्टणम येथून नव्याने आलेली 15 जणांचे नौदलाचे पथक शिरोळसाठी
पाठविण्यात आले आहे. उद्याही या भागातील गावांमध्ये अन्नाची पाकिटे, जीवनावश्यक
वस्तूंचा पुरवठा हेलिकॉप्टरमधून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
बोटीमधून
आज एलपीजीची 87 सिलिंडर शहरामध्ये आणण्यात आली. 20 सिलींडर शिरोळ येथील
टाकळीवाडीतील गुरुदत्त कारखान्यावर असणाऱ्या शिबीरामध्ये पाठविण्यात आली. सातारा
कागल महामार्गाची आज पाहणी केली. या महामार्गावरील पाणी पातळीमध्ये घट होत असून
उद्या दुपारपर्यंत पाणी पातळी कमी झाल्यास प्राधान्याने एलपीजी गॅस टँकर, डिझेल
पेट्रोल टँकर शहरामध्ये आणण्यात येणार आहेत. 7 हजार 930 गॅस सिलींडर भरलेले ट्रक
तसेच डिझेल व पेट्रोलचे टँकर शिरोलीच्या बाजूला उभे आहेत. शहरातील सर्व पंपावर दोन
दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल उपलब्ध होईल. हे इंधन दूध, भाजीपाला तसेच जीवनावश्यक
वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. कागल
तालुक्यातील करनूर, वंदूर, सुळकूड या गावातील तीन गर्भवती महिलांना सुरक्षित बाहेर
काढून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तीन डायलेसीस रुग्णांनाही सुरक्षित
बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.